Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक-पुणे ग्रीन कॉरिडोर यशस्वी; चौघांना जीवदान

नाशिक-पुणे ग्रीन कॉरिडोर यशस्वी; चौघांना जीवदान

नाशिक । प्रतिनिधी

नेपाळमधून रोजगाराच्या शोधात नाशिकमध्ये आलेल्या तरूणाचा दिंडोरीरोडवर झालेल्या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मेंदू मृत होतो. मेंदू मृत झाल्यानंतर जीवन संपुष्टात येते, असे डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना पटवून देत अवयवदान चळवळीची माहिती दिली. त्यामुळे या कुटुंबियाने वेळ न दवडता अवयवदानाचा निर्णय घेतल्याने ‘याच’ युवकाच्या अवयांवमुळे चौघा गरजू रूग्णांची मृत्यूशी झुंज थांबणार आहे. या युवकाचे अवयव शनिवारी (दि.१८) ‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे पुणे जिल्ह्यातील बाणेर येथील रूग्णालयांत पोहोचविले.

- Advertisement -

रोजगाराच्या शोधात राज्यात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. नोकरी आटोपून दिंडोरीरोडवरून दुचाकीने घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिलन यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

गंगापूररोडवरील ऋषिकेश रूग्णालयात त्यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. डॉक्टर भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व त्यांच्या पत्नी मीनल शर्मा व कुटुंबातील अन्य सदस्यांना पटवून दिले. यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्काळ याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेडटीसीसी) रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली.

केंद्राकडून बाणेर येथील ज्यूपिटर व पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात गरजू रूग्ण असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार दोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयव वरील रूग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास शहर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या ‘ग्रीन कॉरिडोर’मधून पोहचविण्यात आले. सुमारे तीन तासांत २२० किलोमीटर अंतर कापत एमएच ०४ जीपी २२२९ या क्रमांकाची रूग्णवाहिका बाणेर येथील रूग्णालयात पोहचली. शहर वाहतूक पोलिसांनी चिंचाली फाट्यापर्यंत या कॉरिडोरची धुरा सांभाळून पुढे नाशिक ग्रामिण पोलिसांकडे जबाबदारी सोपविल्याचे पोलीस उपनिरिक्षक सुजीत मुंढे यांनी सांगितले.

असा होता ‘ग्रीन कॉरिडोर’
गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, वनविभाग सिग्नल, मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नलवरून कालिकामंदीरमार्गे, मुंबईनाका व तेथून महामार्गाने वडाळानाका, द्वारका, काठेगल्ली, दत्तमंदीर, चेहडीमार्गे सिन्नर, नांदूरशिंगोटेपासून पुढे नाशिकफाट्यावरून बाणेर.

- Advertisment -

ताज्या बातम्या