राज्यात नाशिक सर्वात थंड शहर
स्थानिक बातम्या

राज्यात नाशिक सर्वात थंड शहर

Abhay Puntambekar

नाशिक  । प्रतिनिधी

तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून निफाड तालुक्यातील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात ६ अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तरेत पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली असून यामुळे आलेल्या शीतलहरींमुळे पारा पाच ते सहा अंशाने खाली आला आहे.

महाराष्ट्रात यंदा उशिरा आलेल्या थंडीनंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात थंडीचा प्रकोप झाल्याचे दिसून आले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भातील पारा ५ ते ६ अंशावर गेल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२ अंशावर गेला होता. यंदाच्या थंडीत सर्वात कमी किमान तापमानाची नागपूर येथे झाली होती. यानंतर नाशिकला पाच वेळा राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वरला मागे टाकत नाशिकचे किमान तापमान खाली आले आहे. काल. नाशिकचे तापमान अचानक ६ अंशाने खाली घसरले. बुधवारी नाशिकचे किमान तापमान १३.९ असताना काल  (गुरुवारी) ते ७.९ अंशावर आल्याने थंडीचा फटका बसला आहे. जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात नाशिकचा पारा ६ ते ७ अंशापर्यंत आला होता. निफाड तालुक्यातील पारा २ ते ३ अंशावर घसरला होता.

गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. पारा अचानक खाली आल्याने द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष काढणीच्या कामात व्यत्यय येऊ लागला आहे. विदभर्र्, मराठवाड्यात पारा खाली असल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com