४२ लाख शिक्षकांना ‘निष्ठा’ प्रशिक्षण; केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा मानस
स्थानिक बातम्या

४२ लाख शिक्षकांना ‘निष्ठा’ प्रशिक्षण; केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा मानस

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने २२ ऑगस्टला ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन स्कूल टीचर्स हेड होलिस्टिक ऍडव्हान्समेंट’ (निष्ठा अर्थात एनआयएसएचटीएचए) या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली. यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याचे राज्यस्तरीय तसेच तालुकानिहाय आयोजन करण्याबाबत आदेश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत देशातील ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा (एचआरडी) मानस आहे. यात अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्ट्ये, किचन गार्डन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे प्रशिक्षण प्रथम राज्यस्तरावर आणि नंतर तालुकास्तरावर देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पाच तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयाचा प्रत्येकी एक असे पाच शिक्षक असतील. त्यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण होणार असून यात संवाद कौशल्येही शिकविली जाणार आहेत.

यानंतर हे तज्ज्ञ तालुकास्तरावर प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर एक तज्ज्ञ समिती असेल जी या सर्व प्रशिक्षणावर तसेच प्रशिक्षणानंतर येणार्‍या अडचणी सोडवण्यात शिक्षकांना सहाकार्य करेल तर त्यांच्यावर राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती असेल. प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे या उद्देशाने असे विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे.

३ लाख शिक्षकाणी केली नोंंदणी
केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेऊन ही या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दरम्यान, निष्ठा पोर्टलला आत्तापर्यंत ५४ लाख ८९ हजार ७० लोकांनी भेट दिली आहे. त्यातील २ लाख ९६ हजार ९७० लोकांनी नोंदणी केली आहे. तसेच निष्ठा हे ऍप १ लाख ४७ हजार २० लोकांनी डाऊनलोड केले आहे.

अडीच लाख शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
निष्ठा कार्यक्रमासाठी १२० नॅशनल रिसोर्स ग्रुप बनविण्यात आले असून ३३ हजार स्टेट रिसोर्स ग्रुप स्थापण्यात आले आहेत. ‘निष्ठा’ च्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार ३६ राज्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.त्यात आजमितिस एसपीआरएल घटकाच्या १५७६, केआरपीएस घटकात ७७१७ तसेच हेडस/प्रिंसिपल घटकातील २१४२७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासह २ लाख २६ हजार २४३ शिक्षकांना प्रशिक्षण देंण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com