नागपूर, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित; चौकशीचे आदेश- अन्न पुरवठा मंत्री भुजबळ
स्थानिक बातम्या

नागपूर, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित; चौकशीचे आदेश- अन्न पुरवठा मंत्री भुजबळ

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

कोविड-१९ साथरोग काळात रेशन लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच ज्या राईस मिल मधून निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करावी असे आदेश त्यांनी दिले.

अनेक जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून सीएमआर साठवलेल्या सर्व गोदामांची सखोल तपासणी करण्यात यावी असे आदेश भुजबळ यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून नमुने पाहणीसाठी मागवले असता त्यांना तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांचेकडून माहिती घेतली असता नाशिक जिल्ह्यात नागपूर येथील गोदामातून तांदूळ प्राप्त झालेला अाहे. नागपूर गोदामात आलेला तांदूळ हा गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मधून प्रक्रिया होऊन प्राप्त झाल्याची त्यांना माहिती मिळाली.

निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने शासनाची बदनामी होत आहे. तसेच गरजू लाभार्थी देखील लाभापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब त्यांनी सचिवांना निर्दशनास आणून देत निकृष्ट प्रतीचा तांदूळ ताब्यात घेऊन गोदामात साठवणुकीसाठी जबाबदार असणारे तपासणीस सनियंत्रण करण्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर व जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश त्यांनी दिले. तसेच ज्या राईस मिल मधून प्रक्रिया केलेला निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झालेला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करण्यात यावी, असे आदेश त्यांनी सचिवांना दिले.

Deshdoot
www.deshdoot.com