एसटीला २२० कोटी रुपये; सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनाने दिली रक्कम
स्थानिक बातम्या

एसटीला २२० कोटी रुपये; सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनाने दिली रक्कम

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

‘एसटी’च्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवासभाडे सवलत देण्यात येते. या सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनाने २२० कोटी रुपये एसटी महामंडळाला रोख दिले आहेत. त्यामुळे महामंडळावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळणार आहे.

एसटी महामंडळाकडून विविध प्रवासीवर्गाला प्रवास भाडयात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासन एसटी महामंडळाला करत असते. ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीतील शिल्लक सवलत मूल्यांच्या रकमेपैकी ४७८ कोटी ९५ लाख ७४ हजार २२२ रुपये रोखीने वितरित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनास सादर केला होता.

त्यानुसार एसटी महामंडळाला २२० कोटी रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले. यामुळे एसटीवरील आर्थिक भार कमी होताच थकित बिले, वेतन इत्यादी कामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्‍या चालकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांना १५ हजार रुपये रोख, शाल व 25 वर्षे सुरक्षित सेवा दिल्याचा बिल्ला दिला जाईल, अशी माहिती महामंडळाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com