Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवाफाळलेल्या चहासोबत उघडली आठवणींची शिदोरी

वाफाळलेल्या चहासोबत उघडली आठवणींची शिदोरी

जनस्थान आयोजित आठवणीतला चहा स्नेहमेळावा संपन्न

नाशिक । दिनेश सोनवणे 

- Advertisement -

तासिका संपल्यानंतर कॉलेजच्या कट्टावर रंगलेला चर्चांचा फड चहाची तलफ पुर्ण करण्यासाठी चायटपरीवर गेल्याबिगर राहत नसे. अनेक वेगवेगळ्या अपडेटस् याच ठिकाणी मिळत असत. अशा या चायटपरीवर पुन्हा एकदा जमून त्या काळच्या आठवणींना उजाळा देतांना उचंबळून आलेल्या भावना ’जनस्थान’च्या सदस्यांनी वाफाळलेल्या चहाबरोबर व्यक्त केल्या. यावेळी गप्पागोष्टी, गायन, बासरीवादन, अनुभव कथन आदींचा आस्वाद या ग्रुपच्या सदस्यांसह नाशिवकमधील दिग्गजांनी याठिकाणी येत आनंद घेतला.

गेल्या काही वर्षांपासून जनस्थान या ग्रुपच्या सदस्यांनी कॉलेजरोडवरील सलीम चायच्या टपरीवर एकत्र जमत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आठवणीतला चहा हा कार्यक्रम सुरु केला आहे. यावेळी प्रत्येक सदस्यांनी आपल्या गत जीवनातील काही स्मृती या चायटपरीसोबत कशा घनिष्ठ राहिलेल्या आहेत, त्या अनुभवांची शिदोरी यावेळी उघडली. मोहन उपासनी यांच्या मधुर व सुरेल बासरीवादनाने सलीमच्या चाय टपरीवरील सकाळ सुगंधित करून गेली. त्यावर वरतान म्हणून रागिनी कामतीकर यांच्या भावगीतांनी तेथील वातावरण सर्वांना जुन्या काळात घेऊन गेले.

चाय टपरीतील सर्वात आकर्षण ठरले ते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे अनुभव कथन. त्यांचे कोल्हापूर येथील महाविद्यालयीन काळात तंगड्या तुडवित आवडता चहा पिण्यासाठी कसे जायचो आणि युपीएससीचा अभ्यास करायचो हे सांगतांना त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसल्या.

नाशिकच्या जनस्थान ग्रुपकडून केल्या जाणार्‍या या उपक्रमांची महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थांनी प्रेरणा घ्यायला हवी असेही त्यांनी यावेळी सांगितले. सकाळी सात वाजता सुरु झालेला जनस्थान मंडळींचा स्नेहमेळावा अकरा वाजून गेला तरी सुरुच होता. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रुपचे संस्थापक अभय ओझरकर, विनोद राठोड यांच्यासह सदानंद जोशी, सुभाष दसककर,अतुल चांडक, नवीन तांबट, राजेश जाधव, राजा पाटेकर, लक्ष्मी पिंपळे, मोहन उपासनी, प्रसाद गर्भे, विनायक रानडे, विवेक गरुड, ईश्वर जगताप, शाम लोंढे, सी.एल. कुलकर्णी, ईश्वरी दसककर आदींसह शंभर जणांच्या ग्रुपने या स्नेहमेळाव्याचा आनंद घेतला व सलीमची टपरी ही सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे माध्यम असल्याचे सर्वांनी शिक्कामोर्तब केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरजे भूषण मटकरी याने करत सर्वांना बोलते मात्र केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या