आरोग्य महोत्सवाला ओझर येथे प्रचंड प्रतिसाद
स्थानिक बातम्या

आरोग्य महोत्सवाला ओझर येथे प्रचंड प्रतिसाद

Abhay Puntambekar

सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रम : नामकोच्या डॉक्टरांनी केली तपासणी

ओझर । वार्ताहर

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दै. ‘देशदूत’ तर्फे आयोजित महिला आरोग्य महोत्सवाला ओझर येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक महिला आणि विद्यार्थिनींनी आरोग्य तपासणी करून घेतली. ओझर येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळेत आरोग्य महोत्सव झाला.

उदघाटन प्रसंगी सरपंच सौ.जान्हवी कदम, ओझर मर्चण्ट बँकेच्या संचालक डॉ.सौ.मेधा पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे, अ‍ॅड.वैदेही कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या कांचन हुजरे, मुख्याध्यापक एल.एस.जाधव, पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप अहिरे, शाळा समितीचे सदस्य बाळासाहेब फुलदेवरे, देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के.सोनवणे व्यासपीठावर होते.

सौ.जान्हवी कदम म्हणाल्या की, महिलांचे विशेषत: ग्रामीण भागातील महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी देशदूतचे आभार मानले. डॉ.मेधा पाटील म्हणाल्या की, आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जावेच लागते मात्र आरोग्याची चांगली देखभाल केल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. एखाद्या साथीची लागण झाल्यावर सर्वांनाच त्याची बाधा होत नाही. प्रतिकारशक्ती चांगली असेल, सकस आहार व योग्य व्यायाम असेल तर साथरोगांपासूनही दूर राहता येते. देशदूतने सामाजिक जाणिवेतून आरोग्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. घरातील व्यक्तींना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण महिलांसाठी देशदूतने आयोजित केलेल्या उपक्रमाचे कांचन हुजरे यांनी स्वागत केले. महिला आजारी पडली तर सार्‍या कुटूंबाची आबाळ होते. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरेपिस्ट डॉ.रोहन देव म्हणाले की, रोजच्या दिनचर्येत व्यायाम असलाच पाहिजे. विद्यार्थी दशेत अभ्यासाला जसा अग्रक्रम दिला जातो तसा तो व्यायाम आणि खेळालाही दिला पाहिजे. घरातील वडिलधार्‍यांनी अभ्यासाचा आग्रह धरतांनाच व्यायाम आणि खेळाचाही आग्रह धरला पाहिजे. आता व्यायाम केल्यास भविष्यात आजारांपासून दूर राहता येते. नामको हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती नवले म्हणाल्या की, विद्यार्थी दशेत होणार्‍या बदलांकडे मुलींनी डोळसपणे पाहिले पाहिजे. आईशी संवाद वाढवून सार्‍या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आजची मुलगी उद्याची माता असते, त्यामुळे मातृत्व सुलभ व नैसर्गिक होण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेतला पाहिजे. सकस आहार व व्यायामाकडे गांभिर्याने लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविक देशदूतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने यांनी तर सूत्रसंचालन गीता दामले यांनी केले. वार्ताहर उमेश कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी श्री सिध्दीविनायक महिला बचत गट, सैलानी बचत गटाचा सत्कार करण्यात आला. आरोग्य महोत्सवाला आनंदशेख खैरे, आर.टी.कदम, रमेश खैरनार, गंगाधर बदादे, संतोष साळुंके, अविनाश सातपुते, भारती भोज, संगिता वळवी, संतोष सोनवणे, किशोर कचवे, विजय हिरे, अर्चना देवरे, विशाखा गांगुर्डे उपस्थित होते.

नवीन इंग्रजी शाळेत आरोग्य तपासणीसाठी सकाळपासूनच विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर अनेक महिलांनी विविध तपासण्या करुन घेतल्या. डॉ.रोहन देव यांनी पाठ, मणके, खांदे व हाडांच्या विकारांवर उपचार व मार्गदर्शन केले. डॉ. अभिजित सोनवणे, डॉ.अंजली पुनवटकर, डॉ.आरती नवले यांनी महिलांसदर्भातील विकारांची तपासणी केली. डॉ.प्रतिक्षा भागवत यांनी मौखिक आरोग्याची तपासणी करुन मार्गदर्शन केले. त्यांना आशा रत्नपारखी, किरण जाधव, कुसूम महांतो, महेश बेंडकुळे यांनी सहाय्य केले.

सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट
देशदूततर्फे नवीन इंग्रजी शाळेला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले. महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे यांच्याहस्ते मुख्याध्यापक एल.एस.जाधव व विद्यार्थीनींनी त्याचा स्वीकार केला. महाविद्यालयाला वेंडिंग मशिन भेट दिल्याबद्दल मुख्याध्यापक श्री.जाधव यांनी देशदूतचे आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com