मालेगाव :  खंडेराव महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी
स्थानिक बातम्या

मालेगाव : खंडेराव महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे पौष पौर्णिमा अर्थात शुक्रवार (दि.१०)पासून खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होणार असून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने चंदनपुरी दुमदुमणार आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर सुशोभित केले जाणार आहे. जय मल्हार ट्रस्टतर्फे यात्रेकरू भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराजांच्या जेजुरीनंतर चंदनपुरी येथील यात्रोत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे. यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार भक्त लाखोंच्या संख्येने चंदनपुरीत हजेरी लावतात. त्यानिमित्त कोटम भरणे, तळी भरणे, देव भेटवणे आदी धार्मिक विधी पार पाडले जातात. पौष पौर्णिमेपासून यात्रोत्सवास प्रारंभ होतो. या पार्श्वभूमीवर मंदिरास रंगरंगोटी केली जात असून खंडेराव महाराज, म्हाळसाई व बाणाई यांच्या मूर्तींनाही रंगकाम करण्यात आले आहे.

जय मल्हार ट्रस्टतर्फे पाच वर्षांपूर्वीच भाविकांना देवदर्शन सुलभ होण्यासाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेलिंगची दुरुस्तीही केली जात असून मंदिर परिसरात हायमास्ट बसवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रस्टतर्फे २५ स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत.

पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळी ७ वाजता चंदनपुरीत मानाच्या काठ्या व खंडेराव, म्हाळसाई, बाणाई यांच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. कृषिमंत्री दादा भुसे व अनिता भुसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महापूजा व महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होईल. यात्रोत्सवानिमित्त खेळणी, पाळणे, करमणुकीची साधने, हॉटेल्स, संसारोपयोगी वस्तू आदींची दुकाने थाटण्यात येणार असून ग्रामपंचायत व ट्रस्टतर्फे जागावाटपाचे नियोजन केले जात आहे.

आतापासूनच खेळणी, पाळण्यांसह अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून तळी भरण्यासाठी वाघ्या-मुरळींची पथकेदेखील चंदनपुरीत दाखल झाली आहेत. येत्या शुक्रवारपासून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर घुमणार आहे.

यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज सकाळी सरपंच योगिता अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रिक्षा पार्किंगसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याबरोबरच वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी रस्त्याच्या कडेस श्रीफळ, बेल, भंडारा व पूजा साहित्याची दुकाने तसेच देव उजळवणार्‍या सुवर्ण व्यावसायिकांना बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहतुकीस कुणीही अडथळा निर्माण केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला. बैठकीस पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, रत्नाकर नवले, परिवहन अधिकारी शेख, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, मनपाचे संजय पवार, जय मल्हार ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील, सूर्यकांत पाटील, राजू पाटील, जगन हरपुळे, समाधान उशिरे, जोपुळे आदी उपस्थित होते.

यात्रोत्सवास येणार्‍या मल्हार भक्तांसाठी चंदनपुरी ग्रामपंचायत व जय मल्हार ट्रस्टतर्फे विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. महामार्गावरील शालीमार चौफुलीपासून चंदनपुरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडेझुडपे तोडण्यात आली असून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅरो प्लान्ट कार्यरत केला आहे. यात्राकाळात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
सतीश पाटील
अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट

Deshdoot
www.deshdoot.com