रोईंग खेळातील महादेवपुरचा उगवता ‘सुर्य’
स्थानिक बातम्या

रोईंग खेळातील महादेवपुरचा उगवता ‘सुर्य’

Abhay Puntambekar

नाशिक । दिनेश सोनवणे

कुठलीही खेळाची पार्श्वभूमी नसताना येथील सुर्यभान घोलपने रोईंग क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवले. आज राज्य सरकारचा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराचा मानकरी तो ठरला आहे. नाशिकपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या महादेवपुर येथील आदिवासी बहूल भागातील सुर्यभान असून अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याने हा सन्मान मिळवला आहे.

सुर्यभानचे आईवडील शेतमजूरी करतात. त्याला खेळाची आवड तशी लहानपणापासूनच होती. खो-खो कबड्डी, कबड्डी मला खेळायला त्याला आवडे. शहरात जाऊन काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने तो नाशिकमध्ये आला. तेव्हा मित्रांसोबत कुठल्यातरी नवीन साहसी खेळात करीयर करायचे मनात आले. मग रोईंग खेळायला लागलो. २०१३-२०१४ मध्ये रोईंगला सुरुवात केली. यावेळी नाशिकचे माजी महापौर प्रकाश मते, अंबादास तांबे यांनी मला खुप मदत केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला.

काही दिवसांनी क्लबमधून माझी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०१३-१४ साली मी राज्यस्तरीय स्पर्धेला उतरलो. यावेळी पहिल्यांदाच पेयर (दोघांची एक जोडी)प्रकारात मला सुवर्णपदम मिळाले. त्याचवर्षी मी चार जणांच्या ग्रुपमधून खेळलो यामध्ये मला कांस्यपदक मिळाले. २०१५ मध्ये राष्ट्रीय स्पर्धा हैद्राबाद येथे झाल्या यामध्ये ओपन नॅशनलमध्ये मला चौथी रँक मिळाली.
यानंतर इंटर कॉलेज, झोन लेव्हल तसेच ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये मी सहभागी झालो. यातही मला चौथी रँक मिळाली.

त्यानंतर २०१५-१६ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. चेन्नई येथे याच वर्षी चॅलेंजर ओपन नॅशनल स्पर्धा झाल्या यात मला रौप्यपदक मिळाले. २०१६ मध्ये चंदीगड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत मला पेयर्स प्रकारात रौप्य आणि कांस्य पदक मिळाले. कोलकाता येथे पहिली इनडोअर नॅशनल चॅम्पियनशिप पार पडली तिथे मी चौथ्या स्थानी राहिलो. २०१७ मध्ये स्टेट चॅम्पियनशिपमध्ये मला सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी एक कांसपदक आणि चौथी रँक असे प्राविण्य मला मिळाले.

२०१७-२०१८ साली राज्यस्तरीय स्पर्धा झाली यात फोर प्रकारात सुवर्णपदक मिळाले. पुणे येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मी सहभाग घेतला.२०१८-१९ ला राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक मला मिळाले. ओपन नॅशनलमध्ये मला चौथी रँक मिळाली होती. गेल्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. यानंतर ओपन नॅशनल ट्रायल्स पार पडल्या यात सुवर्णपदक मिळाले. डिसेंबर २०१९ मध्ये हैद्राबादमध्ये ओपन नॅशनल पार पडल्या यात चौथ्या स्थानी मी होतो.

२०१७-१८ साली मी ग्रामीण पोलीस दलात भरती झालो. तेव्हापासून मला तत्कालीन पोलीस अधीक्षकांसह सध्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, प्रशिक्षक समाधान गवळी यांनी केलेल्या सहकार्यांने आणि योग्य मार्गदर्शनाने मला इथवर पोहोचता आले. सध्या मी केटीएचएम महाविद्यालयाच्या बोटक्लबमध्ये सराव करतो. येथील योगेश गांगुर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते आहे.

रोईंगमध्ये सातत्य हवे

खेळात सातत्य असल्याने सुर्यभान उत्तम खेळाडून बनला आहे. तो प्रचंड मेहनती आणि ध्येय गाठण्यासाठी तो उतरतो. मोठ्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळावे यासाठी आम्ही त्याला कश्यपी धरणातही सरावाला नेले. तिथेही त्याने त्याचेच विक्रम मोडले होते. सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी सुरु आहे.

समाधान गवळी, सुर्यभानचे प्रशिक्षक

Deshdoot
www.deshdoot.com