निफाड : सुंदरपूरला विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
स्थानिक बातम्या

निफाड : सुंदरपूरला विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी

तालुक्यातील सुंदरपूर शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास वन अधिकार्‍यांनी सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, पिंजर्‍यात जेरबंद केलेल्या या बिबट्यास रात्री पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.

आज (दि.२२) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याची एक वर्षाची मादी सुंदरपूर शिवारातील रावसाहेब रामकृष्ण सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत पडली. दुपारी भुसे येथील आघाव यांच्या ही बाब येताच त्यांनी सचिन सोमवंशी व पो. पा. यांचेशी संपर्क करुन याबाबत माहिती दिली.

सोमवंशी यांनी वनविभागाला कळविले. परिणामी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक विजय टेकनार, वनसेवक भैय्या शेख व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला. दुपारी ३:४५ वाजता या बिबट्याच्या मादीस जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

सद्यस्थितीत पकडलेल्या बिबट्याच्या मादीस निफाड येथे वनविभागाच्या रोपवाटीकेत पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. तिला ऊब देवून खाद्य देण्यात आले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टराकडून या मादीची तपासणी करण्यात आल्यानंतर रात्री तिला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com