परमपूज्य वै. बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी सोहळा : संत साहित्यात मानवी मनाचा अभ्यास- चैतन्यमहाराज

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक ।  विशेष प्रतिनिधी

अनेक पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी मनाचे विश्लेषण केले आहे, पण मनाची चंचलता, कार्यप्रवणता सांगूनसुद्धा मनाला ताब्यात कसे ठेवायचे याचा उपाय त्यांनी सांगितलेला नाही. तो उपाय संत साहित्याने सांगितला आहे. माझे मन माझ्या मनाला चांगले म्हणत नाही यातच त्याचा मोठेपणा दिसतो. मनावर ताबा मिळवण्याकरता, मन चांगले करण्यासाठी ते रजोगुणाच्या फांदीवरून सत्वगुणाच्या फांदीवर येण्याची आवश्यकता आहे. संत वाड्.मयाने हा विचार अधिक सरळ आणि सोपा केला आहे. आधुनिक मानसशास्त्राची अशी चर्चा संत साहित्यात केलेली आहे. त्यात जे उपाय सांगितले ते मानवाला कल्याणाकडे घेऊन जाणारे आहेत. संतांनी मानवी मनाचा ज्या पद्धतीने अभ्यास केला व त्याचे प्रकटीकरण केले ते खूप महत्त्वाचे आहे. त्याअर्थी संत साहित्याला आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री मानायला हरकत नाही, असे मौलिक विचार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांचा ५६ व्या पुण्यतिथी सोहळा येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू झाला आहे. त्यानिमित्त संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प चैतन्यमहाराज यांनी काल  गुंफले. व्याख्यानाच्या आरंभी वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या अर्धकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

चैतन्यमहाराज म्हणाले, मानवी मनाविषयी कोणतेही पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ बोलू शकलेले नाहीत इतके भाष्य संत वाड्.मयाने त्यावर केले आहे. संत वाड्.मय मनावर प्रकाश टाकते तसे पाश्चात्य मानसशास्त्रात नाही. मनाचे अस्तित्व काय आहे ते कोणताही मानसशास्त्रज्ञ सांगू शकत नाही. संत मात्र सांगून जातात. मनाचे कार्य, मनाच्या विविध प्रवृत्ती आणि मनाचे संबंध यांचा वेध घेणे म्हणजे मानसशास्त्र आहे. शब्द किंवा कृती या दोनच तर्‍हेने मनाचे अनुमान करता येते. ही दोनच माध्यमे आहेत. त्यातून मनाचा अभ्यास करणे शक्य होते. ज्ञानेश्वर महाराज माणसाच्याच मनावर बोलतात असे नव्हे तर मुंगी आणि माशीच्या मनाबाबतही ते बोलतात.

एखादा माणूस सज्जनतेचा वा सुशिक्षितपणाचा आव आणत असेल तर त्याचे मन ओळखता येणार नाही. तसे असेल तर हे निकष त्रोटक आहेत. माणसाच्या कृतीमागे काहीतरी हेतू असतो. मंदबुद्धीचा माणूससुद्धा काहीतरी प्रयोजनाशिवाय व्यक्त होत नाही. मनातील विचारांबाबत ‘मनोव्यापार’ हा शब्द वापरला जातो. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल? त्यात काय अपेक्षित असेल? त्याची दोनच साधने आहेत. एक म्हणजे शब्द आणि दुसरी कृती! शब्द वापरणे शक्य नसते तेव्हा कृतीतून ते स्पष्ट करावे लागते.

गंगोत्री म्हणजे जेथे गंगेचे प्राकट्य झाले आहे असे स्थान, पण तो गंगेचा आरंभ नाही. गंगोत्रीत प्रकटण्याआधी गंगा नव्हती असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे मानवी जीवनसुद्धा ज्या-ज्या विचारांनी तृप्त, समाधानी होईल अशी मांडणी म्हणजे संत वाड्.मय! वेदापासून चालत आलेले तत्वज्ञान संत वाड्.मयातून येते. वेदांतील विचाराची कठोरता, कर्कशता टाळून तो विचार व ते चिंतन समाजाभिमुख व्हावे या पद्धतीने मांडले जाते. कोणत्याही शास्त्राचा प्रारंभ संत वाड्.मय करीत नाही. मात्र त्याची मांडणी संतांनी नव्याने केली आहे, ही बाब चैतन्यमहाराज यांनी श्रोत्यांना समजून सांगितली.

मानसशास्त्रात काय आहे? मानसशास्त्राच्या संबंधाने संत वाड्.मयाचा विचार करता येईल का? दोन ग्रीक शब्दांपासून ङ्गमानसशास्त्रफ हा शब्द बनला आहे. त्याचा मूळ अर्थ आत्म्याचे शास्त्रफ असा आहे. या शास्त्राचे अस्तित्व फार जुने आहे असे नाही. दीड-दोनशे वर्षांपासून ते अस्तित्वात आले आहे. पातंजली योगसूत्राला मानसशास्त्र म्हणण्याची परंपरा आहे. पातंजक मुनींच्या दोन सूत्रांमधून नेमका विषय कळतो, असे त्यांनी सांगितले.

मन ताब्यात येणे हाच देव!
विविध वचने आणि दृष्टांतातून चैतन्यमहाराजांनी मन ही संज्ञा स्पष्ट केली. मन बंधनात टाकते आणि बंधनातून मुक्तही करते. मनाने मानले तर मी मुक्त आणि मनाने मानले तर मी बद्ध आहे. सारे मानण्यावर, मनावर अवलंबून आहे, असे तत्वज्ञान संत वाड्.मयात सांगितले आहे. मन अनुकूल झाले तर कोणताही देव वेगळा नाही. मन ताब्यात येणे हाच देव आहे. मन ताब्यात आले, मन कळाले तर तुमच्यात आणि माझ्यात काय वेगळे आहे? मन जर ऐकेल, मनावर प्रभुत्व राहील तर मनाचे मनपण संपून जाईल. तेव्हा देव आणि भक्त असा फरक उरणार नाही.

मनावरील परिणामांचा परिपाक
कोणते स्वप्न केव्हा पडावे ते माणसाला ठरवता येत नाही. भरल्या घरातसुद्धा वाईट स्वप्ने पडतात. तसे कधी-कधी वाईट काळातदेखील चांगली स्वप्ने पडतात. ज्या व्यक्तीला आपण कधीही भेटलो नाही अशी कोणतीही व्यक्ती कधीही स्वप्नात येत नाही. वृत्तपत्रात अथवा सिनेमात त्या व्यक्तीचे चित्र पाहिले असेल तर अशी व्यक्ती स्वप्नात दिसते. अनभिज्ञ व्यक्ती कधी दिसत नाही. स्वप्नेदेखील मनावर झालेल्या परिणामांचा परिपाक असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *