मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवारी मतदान; जिल्ह्यातून होळकर,हिरे उमेदवार
स्थानिक बातम्या

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवारी मतदान; जिल्ह्यातून होळकर,हिरे उमेदवार

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी शनिवारी (दि.२९) मतदान होणार आहे.नाशिक विभागातून दोन जागा निवडून द्यायच्या असून आठ उमेदवार रिंगणात आहेत.नाशिक जिल्ह्यातून एकूण २३८ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

या बाजार समिती सदस्यांची निवड ही सन २०१९-२० ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी होणार आहे.यात नाशिक विभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत.यासाठी बाजार समित्यांमध्ये सोसायटी गटातून निवडून आणलेले संचालकच मतदान करू शकणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात एकूण २३८ मतदार आहेत.नाशिक विभागातून म्हणजेच नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांतून एकूण ७७८ मतदार आहेत.२९ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा उपनिबंधकांचे कार्यालय हेच मतदान केंद्र राहणार आहेत.त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील मतदारांना सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून महाविकास आघाडीतर्फे लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर,धुळे बाजार समितीचे उपसभापती रितेश सुरेश पाटील हे उमेदवार आहेत.इतर उमेदवारांमध्ये प्रभाकर पवार,सुनिल पवार,किशोर पाटील (सर्व जळगाव)किशोर पाटील, किशोर देवीदास पाटील(नंदुरबार) श्रीहर्ष शेवाळे(अहमदनगर),अद्वय हिरे (नाशिक) हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

जिल्हा                मतदार         बाजार समिती
नाशिक                २३८              १६
अहमदनगर          २१०              १४
जळगाव              १७२               १२
धुळे                     ५८                 ४
नंदुरबार               ६०                 ४

Deshdoot
www.deshdoot.com