सटाणा नगरपरिषदेस आयएसओ मानांकन

सटाणा नगरपरिषदेस आयएसओ मानांकन

सटाणा । प्रतिनिधी 

प्रशासकीय कामकाज व नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा-सुविधांच्या गुणवत्तेनुसार येथील नगर परिषदेस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. येथील नगर परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची गुणवत्ता व देण्यात येणार्‍या सेवा-सुविधांच्या गुणवत्तमुळे आयएसओ मानांकनासाठी सटाणा नगरपरिषद पात्र असल्याने प्रमाणीकरण करण्याबाबत ३१ मे २०१९ रोजी ठराव करण्यात आला होता.

आयएसओ मानांकन मिळाल्याने नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून ९००१:२०१५ या शृंखलेत मानांकन प्राप्त करणारी सटाणा नगरपरिषद संपूर्ण राज्यातील पहिली नगर परिषद ठरली आहे. आयएसओ मानांकन व त्याचे सातत्य टिकविण्यासाठी आगामी काळात कायमस्वरूपी गुणवत्तापूर्ण कामकाज करावे लागणार आहे.

फरीदाबादच्या डॅस सिस्टिम अ‍ॅण्ड सर्विस यांच्यामार्फत कार्यकारी संचालक डी.आर. शर्मा यांच्या स्वाक्षरीने नगरपरिषदेस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नगरपरिषदेचे आयएसओ परीक्षण नाशिकचे परीक्षक विनोद येवले यांच्यामार्फत पुर्ण करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

नगरपरिषदेच्या आयएसओ मानांकन प्राप्त कामगिरीसाठी कार्यालय अधीक्षक माणिक वानखेडे, संगणक अभियंता गौरव जोपळे, बांधकाम अभियंता चेतन विसपूते, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, संगणक परिचालक दिनेश कचवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रशासनातील गुणवत्ता, ई-गव्हर्नन्सअंतर्गत संगणकीय सेवा, नगरपरिषद अधिनियम महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात नमूद सेवा तसेच अधिनियमाखाली तयार करण्यात आलेल्या नियमांच्या अनुषंगाने देण्यात येणार्‍या सेवांसाठी आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. असे मानांकन प्राप्त करणारी सटाणा नगरपरिषद राज्यात पहिलीच ठरली आहे.
सुनील मोरे
नगराध्यक्ष, सटाणा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com