Saturday, May 11, 2024
Homeनाशिकजागतिक महिला दिन विशेष : इस्त्रो मधील मिसाईल महिला

जागतिक महिला दिन विशेष : इस्त्रो मधील मिसाईल महिला

नाशिक | प्रा.विजया पंडित 

अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रातही महिलांनी आपल्या प्रतिभेने आणि बुद्धिमत्तेने आपली छाप उमटवली आहे. सध्या १६ हजारहून अधिक महिला भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोसाठी काम करताहेत आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहेत.

- Advertisement -

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या गेल्या काही वर्षांतील यशस्वी मोहिमांचे कौतुक विकसित देशांनीही केले आहे. येणार्‍या काळातही इस्रो आणखी काही मोहिमा राबवणार असून देशाच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवणार आहे. या यशामागे काही खास गोष्टी आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये बुद्धिमान महिला सहभागी होत्या. या महिलांच्या यशाची सीमा आकाशापर्यंतच मर्यादित नाही तर त्यापुढेही त्यांचे जग आहे. या उत्साही, सशक्त आणि आत्मनिर्भर महिला आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या सामान्य महिलांप्रमाणेच आहेत, पण त्यांच्यातील वैज्ञानिक प्रभाव त्यांचा दर्जा काही खास बनवतो.

एन. वलारमथी
भारताचे पहिले स्वदेशी रडार इमेजिन उपग्रह रिसेट वनच्या प्रक्षेपणाचे प्रतिनिधित्व एन. वलारमथी यांनी केले. टी. के. अनुराधा यांच्यानंतर उपग्रह मोहिमेच्या प्रमुख म्हणून दुसर्‍या महिला अधिकारी म्हणून वलारमथी यांचे नाव घेता येईल. ५२ व्या वर्षी त्यांनी आपल्या मायभूचे तामिळनाडूचे नाव रोषण केले. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटमधील प्रयुक्त मिशनची प्रमुख म्हणून नेमण्यात आलेल्या एन. वलारमथी या पहिल्या महिला आहेत.

रितू करढाल
इस्रोमध्ये अनेक समस्यांवर विचार, चर्चा यामधून उपाय शोधणारी रितू, दोन मुलांची आई आहे. तरीही बहुतेकदा आठवड्याचे शनिवार, रविवारही त्या इस्रोमध्येच काम करत असतात. रितू लहान होत्या तेव्हा चंद्राच्या कला पाहून आश्चर्यचकित होत. चंद्र लहान मोठा कसा होतो याचे त्यांना कुतूहल होते. त्यामुळे चंद्राशी निगडीत अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात असायचे. आता खूप वर्षांनंतर त्यांना मंगलयान मोहिमेचे डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. लहानपणी अंतराळ विज्ञानाविषयी हरेक लहान मोठी माहिती वाचत असत आणि आज इस्रोच्या या बहुचर्चित मोहिमेच्या प्रमुखांपैकी एक आहेत.

मीनल संपथ
मंगळयान मोहिमेसाठी दिवसाचे तब्बल १८ तास काम करणार्‍या मीनल संपथ इस्रोमध्ये सिस्टिम इंजिनिअर म्हणून ५०० शास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या २ वर्षांत त्यांनी रविवारची सुट्टी घेतली नाहीच, पण शासकीय सुट्ट्यांनाही टाटा केला. पण या सर्वांचे फळ त्यांना मिळाले ते मंगळयानाच्या यशाच्या रूपाने मिळालेल्या आनंदातून. आता त्यांचे पुढील लक्ष्य आहे ती राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेची पहिली महिला संचालक होण्याचे.

मौमिता दत्ता
लहान असतानाना मौमिताने चांद्रयान मोहिमेविषयी वाचले होते. आता त्या मंगळयान मोहिमेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करताहेत. त्यांनी कोलकातामधून प्रायोगिक भौतिकशास्त्रामध्ये एमटेकचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या त्या ‘मेक इन इंडिया’मध्ये सहभागी झाल्या असून प्रकाश विज्ञान क्षेत्रामध्येही देशाने प्रगती करावी, यासाठी एका चमूचे नेतृत्व करीत आहे.

नंदिनी हरिनाथ
नंदिनी हरिनाथ यांची पहिलीच नोकरी इस्त्रोमधील. आज वीस वर्षे अथक त्या इस्रोमध्ये कार्यरत आहेत आणि प्रगती करताहेत. टीव्हीवरील स्टार ट्रेक ही मालिका पाहून विज्ञान विषय अभ्यासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कुटुंबात सर्वजण बहुतांश शिक्षक आणि इंजिनिअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी स्वाभाविकच आवड होती. २००० रुपयांच्या नोटेवर झळकणारे मंगळयान मोहिमेचे चित्र पाहून त्यांना खूप अभिमानच वाटतो. मंगळयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी त्या घरीदेखील जात नव्हत्या. त्यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नक्कीच सलाम करावा लागेल.

कीर्ती फौजदार
इस्रोतील कॉम्प्युटर वैज्ञानिक असलेल्या कीर्ती फौजदार उपग्रहाला योग्य कक्षेत स्थापित करण्यासाठी असलेल्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीवर काम करते. उपग्रहांवर आणि इतर मोहिमांवर सातत्याने नजर ठेवणार्‍या चमूमधील एक सदस्य आहेत. काही चुका झाल्यास त्या सुधारण्याचे काम त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कामाची वेळही अनियमित आहे. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी त्यांना काम करावे लागते. त्या स्वतःचे काम न घाबरता शांतपणे चोख पार पाडतात. त्यांचे आपल्या कामावर खूप प्रेम आहे. कीर्तीची भविष्यात एमटेक करून अधिक चांगली वैज्ञानिक होण्याची इच्छा आहे.

अनुराधा टीके

अनुराधा जियोसेट प्रोग्राम डायरेक्टर म्हणून इस्रोमध्ये काम करणार्‍या महिला अधिकारी आहेत. चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा अंतराळयात्री म्हणजे नील आर्मस्ट्राँग होता हे त्यांना कळले तेव्हा त्यांचे वय केवळ ९ वर्षांचे होते. अंतराळयात्री होण्याचा पहिला धडा त्यांना तिथेच मिळाला आणि त्याने त्यांच्यावर मोहिनी घातली. एक वरिष्ठ अधिकारी या नात्याने इस्रोच्या प्रत्येक महिला वैज्ञानिकासाठी त्या प्रेरणास्रोत आहेत. शालेय आयुष्यातही घोकंपट्टी करण्यापेेक्षा त्यांना तर्कशास्त्रात अधिक रस होता. आज इस्त्रोच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या प्रमुख असूनही त्यांची तार्किक बुद्धी मागे हटत नाही.

टेसी थॉमस
भारताच्या मिसाईल महिला असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांनी अग्नि ४, अग्नि ५ या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. टेसी थॉमस इस्रोमध्ये कार्यरत नसल्या तरीही त्या डीआरडीओसाठी तांत्रिक कामे करतात. त्यामुळे इस्रोच्या महिला शक्तीच्या यादीत त्यांचा नक्कीच समावेश होऊ शकतो. त्यांची मेहनत आणि समर्पण यामुळेच भारताला आयसीबीएमएस सह इतर देशांच्या खास समूहाचा भाग होण्यास मदत मिळाली. आपल्या यशामुळे त्या माध्यमांमध्ये अग्निपुत्री नावाने ओळखल्या गेल्या. सध्या १६ हजारहून अधिक महिला इस्रोसाठी काम करताहेत आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या