Monday, April 29, 2024
Homeनाशिकदप्तराचे ओझे हलके करण्यासाठी ’एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’

दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी ’एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’

नाशिक । अजित देसाई

येत्या शैक्षणिक वर्षांपासून शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमासाठी ’एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी बालभारतीच्या वतीने एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम प्रस्तावितअसून राज्यातील ५९ तालुक्यांमध्येपहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची अंलबजावणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

इयत्ता पहिली ते पाचवी या स्तरावरील विषयांची संख्या कमी असल्याने अभ्यासक्रमाचे तीन भाग करण्यात आले असून सहावी व सातवीच्या अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे चार भाग असणार आहेत. या सर्व भागांमध्ये त्या-त्या वर्गासाठीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम विभागण्यात आला असून एक भाग संपल्यावर दुसरा भाग अध्ययन आणि अध्यापनासाठी घेतला जाणार आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढत असून हे ओझे कमी करण्यासाठी अनेक स्तरांतून मतमतांतरे मांडण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठी सूचना केल्यावर शासन स्तरावरून कार्यवाही सुरु झाली. त्यानुसार राज्यातील मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमाची नव्याने मांडणी करत राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने एकात्मिक पाठयपुस्तक योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पथदर्शी म्हणून राज्याच्या काही भागात राबवल्या जाणार्‍या या प्रकल्पाची फलनिष्पत्ती व त्यावरील अभिप्राय याचा विचार करून संपूर्ण राज्यभर हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार / विकार निर्माण होत आहेत. बालवयात जडणार्‍या या आजारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. ओझ्याविना शिक्षण या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाने काही ठोस पावले उचलली आहेत. शासन निर्णयाच्या आधारे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन या सर्वांनी करावयाच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.

केवळ पुस्तके कमी करून चालणार नाही
शासनाने एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करणारा निर्णय घेतला आहे. मात्र केवळ पाठ्यपुस्तके कमी करून चालणार नाही तर त्याबरोबरीने शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय करावी. म्हणजे पाण्याच्या बाटलीचे वजन कमी होईल. कृतियुक्त शिक्षणावर भर दिला तर वह्यांची संख्या देखील कमी होईल. याशिवाय बहुसंख्य विद्यार्थी मार्गर्दशके ( गाईड्स) वापरतात. त्यांचे वजन पुस्तकांपेक्षा अधिकच असते. याशिवाय अन्य शालेयपोयोगी साहित्याचे असणारे वजन देखील विचारात घेणे आवश्यक असते अशी प्रतिक्रिया एका शिक्षिकेने दिली.

शिक्षण विभागस्तरावर अनभिज्ञता
राज्य शासनाने सर्व विषयांसाठी एकत्रित अभ्यासक्रम असणारी पुस्तके विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला असला तरी शिक्षण विभाग स्तरावर मात्र याबाबत एकाही अधिकार्‍याकडे समाधानकारक माहिती असल्याचे दिसून येत नाही. मुळात शासनांचे अथवा शिक्षण विभागाचे परिपत्रकच जिल्हा अथवा तालुका स्तरावर पोहोचले नाही काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. काही प्रमाणात शिक्षकांकडे मात्र याबद्दल माहिती असली तरी त्याबद्दल सध्या न बोललेलेच बरी अशी भूमिका त्यांची आहे. 

एकात्मिक पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्याने आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य सोबत ठेवणे होय. सद्यस्थितीत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक दिलेले आहे. विद्यार्थ्याला वेळापत्रकाप्रमाणे सर्व पाठ्यपुस्तके सोबत घ्यावी लागतात. प्रत्येक पाठ्यपुस्तकाचे स्वतंत्र वजन आहे. ही सर्व पाठ्यपुस्तके एकत्र सोबत घेतल्यामुळे साहजिकच दप्तराच्या ओझ्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे वर्गामध्ये जो विषय शिकवला जात आहे, तेवढेच अध्ययन साहित्य सोबत नेता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या