परदेशात गेेलेल्या नागरिकांची मागवली माहिती
स्थानिक बातम्या

परदेशात गेेलेल्या नागरिकांची मागवली माहिती

Abhay Puntambekar

जिल्हा प्रशासन : टूर ऑपरेटर कंपन्यांशी संपर्क

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून परदेशात असलेल्या नाशिकमधील नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील टूर ऑपरेटर कंपन्यांशी संपर्क साधून परदेशात असलेल्या नागरिकांची आकडेवारी मागवली आहे. ही माहिती राज्य शासनाला दिली जाणार असून हे नागरिक देशात परतल्यावर विमानतळावरच त्यांची तपासणी केली जाणार आहे.

चीनमध्ये उद्भवलेल्या करोना संकटाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून या रोगाने भारतातदेखील प्रवेश केला आहे. देशात करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ रुग्णांना करोना संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. हे सर्व नागरीक परदेशवारी करून आले आहेत. मात्र, वैद्यकीय तपासणी अहवालात संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

खबरदारी म्हणून विदेशातून जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यात पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्टसह सर्वच आस्थापना, विदेशातून येणार्‍या नागरिकांची माहिती रोज घेतली जात आहे. इगतपुरीच्या विपश्यना केंद्रातही विदेशी व्यक्तींचा नियमित वावर असतो. त्यामुळे तेथील कार्यक्रमदेखील १५ मार्चपासून रद्द करण्यात आले आहेत.

कामकाजानिमित्त अनेक नाशिककर हे परदेशात ये-जा करतात. परदेशातून आलेल्या व्यक्तींमुळे करोना व्हायरसची लागण होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला नाशिकमधील किती नागरिक हे परदेशात आहे, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून गोळा केली जात आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातील टूर ऑपरेटर कंपन्यांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडून प्राप्त माहिती ही शासनाला दिली जाईल. जेणेकरून देशात आल्यावर विमानतळावरच त्यांची तपासणी केली जाईल.

नाशिकमध्ये करोनाचे संकट टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाय योजना केल्या जात आहे. परदेशात नाशिकचे किती लोक आहेत, याची आकडेवारी मिळवण्याचे काम सुरू आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com