‘एनसीसी’ छात्रांच्या भोजन भत्त्यात वाढ
स्थानिक बातम्या

‘एनसीसी’ छात्रांच्या भोजन भत्त्यात वाढ

Abhay Puntambekar

केंद्रानंतर राज्य शासनाचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मधील छात्र व अंशकालीन अधिकार्‍यांच्या भोजन भत्त्यात राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली आहे. दैनंदिन भोजन भत्त्यात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून त्यामुळे आता या छात्रांना व अंशकालीन अधिकार्‍यांना प्रतिदिन १०० ऐवजी १५० रुपये भोजन भत्ता मिळणार आहे. या संदर्भातील शासन आदेश राज्य शासनाने नुकताच प्रसिद्ध केला.

माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांविषयीची माहिती मिळावी, त्यांना सशस्त्र दलांमध्ये दाखल होण्यास प्रोत्साहन मिळावे; तसेच त्यांना शिस्त व देशप्रेमाचे धडे मिळावेत, यासाठी १९४८-४९ मध्ये देशात राष्ट्रीय छात्र सेनेची सुरुवात करण्यात आली. त्यासाठी ‘राष्ट्रीय छात्रसेना कायदा, १९४८’ हा तयार करण्यात आला. एनसीसीत सहभागी होणार्‍या छात्रांना तसेच अंशकालीन अधिकार्‍यांना केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध भत्ते दिले जातात. हे भत्ते केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून दिले जातात. त्यासाठी विशिष्ट प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एनसीसीच्या छात्र व अंशकालीन अधिकार्‍यांच्या भत्त्यांमध्ये वाढ केली होती. केंद्र सरकारने भत्त्यांच्या दरांत वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेही त्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारतर्फे ही वाढ केली आहे.

‘एनसीसी’मधील शिबिरांमध्ये (नौकानयन, सायकलिंग शिबिरांसह) सहभागी होणार्‍या छात्रांना यांच्या भोजन भत्त्यांच्या दरांत ही वाढ करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील १०२५ अंशकालीन अधिकार्‍यांना सध्याच्या प्रतिदिन १०० रुपयांऐवजी १५० रुपये भत्ता दिला जाईल, तर ९३ हजार ६४ छात्रांनाही सध्याच्या प्रतिदिन ९५ रुपयांऐवजी आता १५० रुपये दिले जातील. या दोन्हीमध्ये केंद्राचा हिस्सा ७५ टक्के, तर राज्य सरकारचा हिस्सा २५ टक्के राहील. यासाठी क्रीडा व युवक सेवा आयुक्त नियंत्रक अधिकारी असतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com