एप्रिलपासून बीएस-६ मानकांची अंमलबजावणी
स्थानिक बातम्या

एप्रिलपासून बीएस-६ मानकांची अंमलबजावणी

Abhay Puntambekar

परिवहन विभागाचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

प्रदूषणमुक्त आणि इंधन बचत करणार्‍या बीएस-६ (भारत स्टेज-६) मानकांची पूर्तता न केल्यास नवीन वाहन नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. या नव्या नियमांची १ एप्रिल २०२० पासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्यामुळे बीएस-४ प्रकारातील नवीन वाहने रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहता सर्वोच्च न्यायालयाने ‘बीएस-४’ प्रकारातील वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश ऑक्टोबर २०१८ मध्ये दिले होते. त्यामुळे केवळ ‘बीएस-६’ प्रकारातील वाहनांच्याच विक्रीवर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयानंतर ‘बीएस-६’ प्रकारातील वाहने बनवण्यावर कंपन्यांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले.

नवीन मानकामुळे पेट्रोल आणि डिझेलचीही बचत होण्याबरोबरच ८५ टक्के प्रदूषणकमी होण्यास मदत होणार आहे. ‘बीएस-४’ वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर नवीन प्रकारातील वाहने खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. केवळ याच आधारावर नाही तर कोळशाची किंमत, वाहतुकीचा खर्च इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन नवे दर ठरवले जातात. त्यामुळे वाहनचालकाबरोबरच वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांवरही आर्थिक बोजा वाढत आहे.

नव्याने आदेश
या नव्या निर्णयाची महाराष्ट्रातही अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने तीन दिवसांपूर्वीच आदेश जारी केले आहेत. १ एप्रिल २०२० पासून ‘बीएस-६’ मानकांची पूर्तता न करणार्‍या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चार मानक असलेली वाहने येऊ शकणार नाहीत. जुन्या वाहनांसाठी हा आदेश मात्र नाही, असेही स्पष्ट केले आहे. प्रदूषणमुक्तीचा मार्ग बीएस म्हणजे भारत स्टेज. इंधनाची गुणवत्ता आणि वाहनामधून निघणार्‍या धुरासाठी कायदे असून ते पाळणे वाहन कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळेच प्रदूषणमुक्तीसाठी वाहनांना बीएस-६ नवीन मानक अनिवार्य केले जात आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन मानक असलेल्या ‘बीएस-६’ची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून केली जाईल, असे परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com