देशदूत अभियान : अन्नाची नासाडी थांबल्यास मानव विकास निर्देशांक उंचावेल

देशदूत अभियान : अन्नाची नासाडी थांबल्यास मानव विकास निर्देशांक उंचावेल

नाशिक | प्रतिनिधी 

आपण सगळे अन्नाला देवत्व देत असलो तरी त्याच्या वापराबद्दल आपल्याकडे जागरुकता क्वचितच आढळते. अन्नाची नासाडी हा आज आपल्या देशातला प्रमुख प्रश्न आहे. या प्रश्नांची योग्य हाताळणी झाली तर आपला मानव विकास निर्देशांक आणि राहणीमानाचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे. 5 जानेवारी अर्थात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अन्नाची होणारी नासाडी याचा आपण मागोवा घेऊया.
हे कसं शक्य आहे?

अन्नदाता सुखी भव:॥ आपल्याकडे अगदी सहज उच्चारले जाणारे हे वाक्य किती गहन आहे. ज्या अन्नाचे जिन्नस आपण कष्टाच्या पैशांनी विकत घेतो, आपल्या प्रेमाने, कष्टाने शिजवतो ते कुठलाही विचार न करता टाकून देतो हे विविध प्रकारांनी घडते. आपल्या देशात हजारो कुपोषित बालके वा माणसे मृत्युमुखी पडत आहेत. तिथेच अनेक समाज घटक हे अमूल्य अन्न वाया घालवत आहेत. याचा पर्यावरणावर कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्ष परिणाम होतो आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रात्रीच्या जेवणादरम्यान आपण अनेकदा पाहुण्यांना जेवायला बोलावतो तर कधी घरचेच सदस्य अपेक्षेप्रमाणे जेवत नाहीत. मग हे उरलेले अन्न दुसर्‍या दिवशी टाकून दिले जाते.

हेच अन्नाची नासाडी होण्याचे प्रथम स्थान आणि कारण आहे. पॅक केलेले फास्ट फूड अनेकदा लोकं पार्सल म्हणून घेतात. पण तेवढे खाऊ शकत नाही. मग रस्त्याच्या कडेला त्याच्या प्लॅस्टिक वेष्टणासह टाकून दिले जातात. विविध पार्ट्या, मेळावे, पक्ष बैठका किंवा विवाह सोहळ्यांमधून अन्नाच्या नासाडीला हातभार लागतो. येथे दिले जाणारे अन्नपदार्थ हे वैविध्यपूर्ण, उच्च प्रतीचे आणि खर्चिक असते. भुकेचा अंदाज न घेता केवळ हव्यासापोटी घेतलेले हे पदार्थ ताटात तसेच उरते.

या पापात खरे भागीदार म्हणजे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस. हे अन्नपदार्थ विकून मोठे उत्पन्न मिळवतात व तेवढाच कचरादेखील करतात. बाजारपेठेत काही अपघात किंवा दुर्घटना घडतात जिथे भाज्या किंवा फळे रस्त्यावर फेकून दिली जातात. हे कारण कदाचित अन्नाचा अपव्यय म्हणून विचारात घेणे विचित्र वाटू शकते, परंतु भाजीपाला आणि दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किंवा कमी होणार्‍या किमतींच्या विरोधात राजकीय नेते आणि निषेध करणारे भाज्या, फळे, दूध या मालाचा वापर करतात. सध्या भारतातील अन्नाची नासाडी होण्याची ही काही प्रमुख कारणे आहेत आणि यासारखी इतर कारणेही असू शकतात.

पर्यावरणावर परिणाम
अन्न वाया जाण्याचा परिणाम पर्यावरणावरही होतो. अन्न वाया घालवणे हे उत्पादन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संसाधनांचा अपव्यय आहे. कचरा आणि शहराच्या कचर्‍यामधून गोळा केलेले अन्न साधारणपणे डम्पिंग यार्डमध्ये विल्हेवाट लावले जाते. येथेच ते कुजले की हरितगृह वायू तयार करते, नंतर मिथेन तयार होते. कार्बनडाय ऑक्साईडमुळे वातावरणाला होणार्‍या हानीपेक्षा आणि त्याच्या परिणामापेक्षा हा वायू सुमारे 30 पट जास्त धोकादायक आहे. एक टन अन्न कचर्‍याची विल्हेवाट लावल्यास ते जवळपास ०.९९ टन कार्बनडाय ऑक्साईड उत्पादन करते.

आपण अन्न कचर्‍यात जाण्यापासून वाचविले तर आपण उत्सर्जन एक टनाने कमी करतो. जेव्हा अन्न वाया जाते तेव्हा ते तयार करण्यासाठी वापरलेले स्त्रोतदेखील वाया जातात. खनिजे, माती, प्रयत्न, शक्ती, खते, पाणी इत्यादी सर्व गोष्टी वाया जातात. ज्यामुळे पर्यावरणावर अनावश्यक भार पडतो. जगात तयार होणार्‍या एकूण अन्नापैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते. भारतात दरवर्षी किमान १० दशलक्ष टन अन्न वाया जात आहे. संपूर्ण अपव्ययांपैकी लग्नांमध्ये ६० टक्के वाया गेलेल्या अन्नामध्ये हातभार लागतो.

अन्नाची नासाडी कमी करण्याचा नक्कीच एक मार्ग आहे. आपल्याला फक्त डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. आपल्या घरात फक्त आवश्यकतेनुसार शिजवा. आपण कोणत्याही पाहुण्यांची अपेक्षा करत असाल तर त्यांच्या खाण्याच्या सवयी विचारात घ्या आणि शक्य असल्यास त्यांना विचारून पदार्थ ठरवा. आपल्याला आवश्यक आहे तेवढेच प्लेट्समध्ये घ्या. जेव्हा आपल्या घरी जेवणानंतर किंवा जेवल्यानंतर जेवण उरण्याची शक्यता असते. तेव्हा नवीन डिश तयार करताना त्यामध्ये उरलेले पदार्थ मिसळून आणि थोड्या कल्पकतेचा वापर करून नवीन पदार्थ बनवा. उदाहरणार्थ, उरलेल्या पोळीपासून आपण टॉर्टिला किंवा फ्रँकी बनवू शकता आणि आपल्या मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता.

भात शिल्लक असेल तर त्याच्या पापड्या बनवून स्नॅक्सनंतर तेलात तळता येऊ शकतात. यासारखे अजून बरेच पर्याय आहेत. गरीब आणि गरजू लोकांना शिल्लक ठेवलेले अन्न दान करणे चांगले. जेव्हा आपण एखादी मोठी पार्टी किंवा लग्न वा डिनरची योजना आखत असाल तेव्हा सुज्ञतेने योजना करा. अतिथींची संख्या आणि आवश्यक भोजन किती प्रमाणात लागेल ते विचारात घ्या. आपल्या पार्टीत येणार्‍या पाहुण्यांना अन्न वाया न घालवता वाचवण्याचे महत्त्व आणि कचरा कमी करण्याची आवश्यकता समजावून सांगा. वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमांना अन्नदान करा. असे केल्याने आपण पार्टी दिलेल्या पाहुण्यांची संख्या वाढेल आणि अन्न सत्कारणी लागेल.

रेस्टॉरंट्समध्ये आपल्या भुकेनुसार अन्न मागवा. एकाच वेळी सगळी ऑर्डर देऊ नका. कॉलनीची, सोसायटीची फूड कमिटी बनवा. नंतर दररोज उर्वरित अन्न गोळा करा आणि गरजूंना दान करा. वर दिलेल्या सर्व शक्यतांनंतर आपल्याला आपला आहार टाकण्याची आवश्यकता आढळल्यास, पुढील मार्गाने करा. अन्न प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये लपेटू नका. पॅकेजिंग काढा आणि फेकून द्या. जेणेकरून कुत्री आणि जनावरे जे खाण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्लास्टिक खाऊ नये. जर कुजलेल्या भाज्या असतील तर त्यांना चांगल्या प्रकारे वाळवा आणि आपल्या बागेसाठी खत तयार करा. अन्यथा आपल्या अंगणात एक खड्डा खणून घ्या आणि मग त्यांना मातीने झाकून टाका. यामुळे वातावरणातील मिथेनचे उत्सर्जन कमी होते.

प्रिया सोबळकर,
फिडिंग इंडिया, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com