ग्राउंड रिपोर्ट : कांद्याने  केला वांदा
स्थानिक बातम्या

ग्राउंड रिपोर्ट : कांद्याने केला वांदा

Abhay Puntambekar

नाशिक |  भारत पगारे 

सध्या बाजारात वाढलेले कांद्याचे दर पाहता सर्वमान्यांबरोबरच राज्यकर्तेही हैरान आहेत. या दरवाढीत सर्वांत जास्त फायदा शेतकर्‍यांना मिळत असल्याचा भास निर्मांण केला जात आहे. परंतु खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘देशदूत’ प्रतिनिधी दिनेश सोनवणे व भारत पगारे यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देत सादर केलेला ग्राऊंड रिपोर्ट..

कांद्याचे दर गगनाला भिडले असून देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याला साडेबारा हजार क्विंटल दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो १५० ते १७० रुपये विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या डोळयातून पाणी आले आहे. कांदा दराबाबत ग्राहकांकडून त्रागा सुरु आहे. ही सर्व परिस्थिती बघता जेव्हा कांद्याला चांगला दर मिळतो, तेव्हा ग्राहकांकडून ओरड केली जाते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना दराअभावी कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता. मल्टीप्लेक्समध्ये ३०० रुपयांचे तिकीट नागरिक सहज खरेदी करतात. मात्र, कांद्याला चांगला भाव मिळाला की शहरात नागरिकांच्या डोळ्यात पाणी येते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

सध्याचे कांद्याचे दर घाऊक बाजारात सामान्य होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून हेच दर किरकोळ बाजारात सामान्य होण्यासाठी तीन महिने उजाडू शकतात, असे बोलले जात आहे. शेतकर्‍यावर नेहमीच बाजारात तीन किंवा पाच रूपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ येते. त्यात केव्हातरी लिलावात कांदा विक्रीतून दोन पैसे मिळतात. मात्र, हेच दोन पैसे त्याचा मोबदला किंवा नफा नसून कांदा लागवडीसाठी खर्च केलेले पैसे असतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍याला सर्वसामान्य जनतेनेही समजून घेण्याची वेळ आली आहे, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

नाईलाजास्तव शेतकर्‍यांनी कांदा लागवडीचे क्षेत्र उभारणे पूर्णत: बंद केल्यास नागरिकांना मोठी रक्कम मोजूनही कांदा मिळणे मुश्किल होईल, अशाही भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. निसर्गचक्र बिघडल्याने येत्या काळात ग्लोबल वार्मिंगचा फटका शेती क्षेत्राला बसणार आहे. त्याची सुरूवात झाली आहे. त्यामुळे कांदा व अन्य पिकांचा देशपातळीवर कालबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार शेती केल्यास शेतकर्‍यांसह नागरिक व व्यापार्‍यांनाही तोटा सहन न करता, व्यवसाय करता येऊ शकतो, असाही सूर व्यक्त होत आहे. शेतकर्‍यावर अस्मानी व सुलतानी संकट आल्यावर त्याचे वारेमाप नुकसान होते. शेतमालाचे नुकसान होतेच, शिवाय उत्पन्नासाठी केलेला खर्चही वाया जातो.

यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने द्राक्षबागांचे हजारो हेक्टरवर कोट्यवधीं रूपयांचे नुकसान झाले. याचवेळी शेतकर्‍याने पिकवलेला कादा चाळीत साठवून ठेवला होता. तर लावलेला कांदा काढण्याची वेळ जवळ होती. मात्र या पावसाने कांदा खराब झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ कांदासुद्धा कमी प्रमाणात झाला. तर लाल कांद्याचे रोपही पावसात कुजल्याने व वाहून गेल्याने त्याचीही आवक घटली आहे.
अर्ली खरीपाचा कांदा हाती आलाच नसल्याने शेतकर्‍याला मोठी हिमंत करून वाटचाल करावी लागते आहे. लासलगाव बाजार समितीत कांदा घेऊन येणारे शेकडो ट्रॅक्टर वा वाहने वेटिंगवर असतात, त्यामुळे अनेकदा प्रवेशद्वार बंद करून दुसर्‍या दिवशी लिलाव सुरू केले जातात. यंदा मात्र कांद्याची आवक घटून रोज दोनशे वाहनांनीच कांदा आवक सुरू आहे.

शेतकर्‍याला जेव्हा दोन पैशाचा फायदा होत असतो, तेव्हा सर्वसामान्य ग्राहक कांदा महाग झाला, महिन्याचे बजेट कोलमडले असे म्हणून तिखट प्रतिक्रिया देतात. मात्र बहुतेक कुंटुंबे कोणत्याही सिनेमाला जातांना प्रतिसदस्यांचे दीडशे ते २०० रूपये दराचे तिकीट काढून सोबत ७०-८० रूपयांचे पॉपकॉर्न खरेदी करतात. तेव्हा या खर्चाची बेरीज केल्यास प्रत्येकी ३०० रूपये खर्च होतो. मात्र, हेच कुटुंब एक किलो चांगल्या प्रतीचा कांदा १० रूपये किलोनेच मिळावा, या मानसिकतेत असतो. सहा किंवा सात व्यक्तींच्या कुटुंबाला दरमहा किमान तीन ते चार किलो कांदा लागतो. त्यामुळे सर्वसामान्याने देखील केवळ नाममात्र भावातच कांदा मिळावा, ही अपेक्षा सोडून १०० रूपये दराने कांदा खरेदी करून खावा, अन्यथा खाऊ नये, अशा प्रकारची टिप्पणी सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. हेच मत शेतकर्‍यांनीही व्यक्त केले आहे.

शेतकर्‍याच्या कांदा वा कोणत्याही पिकाला रास्तभाव मिळत नाही. त्यातच नैसर्गिक संकट ओढावल्यास तो आणखीनच खचून जातो. मात्र, तरीही हा शेतकरी कोणतीही तमा न बाळगता पुन्हा नव्या हंगामात वा दुसर्‍या पिकांत उत्पन्न मिळेल, या आशेवर असतो. मात्र तरीदेखील त्याला कोणत्यान कोणत्या संकटाला सामोरे जावे लागतेच. अशाच संकटांचा सामना सध्या कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे. यंदा सर्वत्र परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पावसाने यंदा कांदा उत्पादनाला देखील मोठा फटका बसला. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. किमान रब्बी हंगामात तरी चांगली पिके येतील अशी आशा शेतकर्‍यांना होती.

फक्त ४९०क्विंटल आवक
गेल्या २ ते ५ डिसेंबरपर्यंत म्हणजेच चार दिवसात लासलगाव बाजार समितीत केवळ ४९० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. तर २१ हजार २६४ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे.

जुना कांदा संपला
निफाड येथील बाजार समितीच्या उपबाजारात दि२डिसेंबरपासून कांद्याची आवकच झालेली नाही. शेतकर्‍याकडे कांदाच उरला नसून जुना कांदा संपल्यात जमा आहे. नवीन कांदादेखील लहान आकारात येत असून त्याची टिकवण क्षमता फारच कमी आहे.

निसर्गाने केली हानी
जिल्ह्यात परतीच्या पावसाने कांद्याची रोपे वाहून गेली. अर्ली खरीप पूर्ण वाया गेल्याने काद्याची आवक मंदावली आहे. जोपर्यंत कांद्याची आवक वाढत नाही, तोपर्यंत कांद्याचे भाव चढेच असू शकतील.एन. एस. वाढवणे, सदस्य सचिव, बाजार समिती, लासलगाव.

सरासरी भाव
लासलगाव बाजार समितीत गुरूवार (दि.५) लालम कांद्याला सरासरी सात हजार रूपयांचा भाव मिळाला. पिंपळगाव (ब) येथे लाल कांद्याला सरासरी ७९००, येवला येथे लाल कांद्याला सरासरी ५५०० व उन्हाळ कांद्याला सरासरी १२र रूपये भाव मिळाला.

उत्पादनच कमी
परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. त्यात पिकांचे उत्पादन पूर्णत: घटले. त्यामुळे पिकाची आवक कमी झाली आहे. साधारण: जेथे कांद्याची मागणी १०० किलोची आहे, तेथे 30 किलोच कांदा उपलब्ध आहे, अशी स्थिती आहे.

Deshdoot
www.deshdoot.com