Friday, April 26, 2024
Homeनाशिकमुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून तिच्या प्रियकराची केली हत्या

मुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून तिच्या प्रियकराची केली हत्या

ओंडली शिवारात मिळाले मृतदेहाचे अवयव : घोटी पोलिसांनी आवळल्या संशयितांच्या मुसक्या

घोटी । जाकीरशेख

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात तळेगाव शिवारातील कातोर वाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह मिळून आला. दरम्यान मुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून तिच्या प्रियकराची क्रूर हत्या झाल्याचे उघड झाले असून घोटी पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. संशयितां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळन्यात घोटी पोलिसांना यश आले आहे. पंडित ढवळू खडके असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गेल्या तीन दिवसांपूर्वी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील ओंडली शिवारात एका २० वर्षीय युवकाचा पाय व प्रेताचा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यामुळे या युवकाचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी आला त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटविणे व त्याच्या मृत्यूचे कारण समजणे कठीण होते. दरम्यान इगतपुरी जवळील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील युवकाचा मृतदेह असल्याची खात्री पोलिसांना झाली.

दरम्यान या प्रकरणाच्या तपासाअंती गावातीलच एका महिलेने आपल्या नातलगांच्या मदतीने या युवकाचा खून केल्याची बाब स्पष्ट झाली.त्यानुसार कातोरेवाडी येथील महिला चांगुणाबाई गणपत मेंगाळ हिच्या मुलीचे मयत युवक पंडीत खडके याच्यासोबत प्रेमप्रकरण होते . या प्रेमविवाहाला चांगुणाबाईचा विरोध होता. त्यात त्या मुलीचे लग्न ठरल्याने मुलीच्या लग्नात तिचा प्रियकर अडथळा निर्माण करील या संशयाने चांगुणाबाई हिने विलास प्रथम गावंडा(चांगुणाबाईच्या पहिल्या घराचा मुलगा) रा बोटोशी, याच्या मदतीने व अन्य तिघांची मदत घेऊन पंडित खडके याचा काटा काढण्याचा कट केला.त्यानुसार दि २६ मे रोजी संशयितांनी वैतरणा रोडवरील ओंडली शिवारात पार्टी करण्याच्या बहाण्याने पंडित खडके यास सोबत घेऊन त्यास गाफील ठेवत गळा दाबून ठार मारले व प्रेताची विल्हेवाट लावली.

या बाबतची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ आरती सिंग, अप्पर अधीक्षक श्रीमती वालावलकर, उपअधीक्षक श्रीमती अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे, यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी घोटी पोलिसांनी १) चांगुणाबाई गणपत मेंगाळ, रा तळेगाव,कातोरेवाडी, २) विलास प्रथम गावंडा रा बोटोशी, ता मोखाडा, यांच्यासह ३)कैलास जेठू फसाळे रा कोचाळे ता मोखाडा, ४)प्रकाश नवसु झुगरे रा करोळ, ५)राजू रामदास ठोंबरे रा खंबाळेवाडी ता इगतपुरी यांना अटक करून त्यांच्याविरोधात भादवी ३०२, ५०६, २०१,१२० ब ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह एएसआय अनिल धुमसे, हवालदार शीतल गायकवाड सुहास गोसावी, दीपक खैरनार, आदी करीत आहे.याप्रकरणी संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांनी दिली.

आव्हानात्मक घटनेची झाली उकल
इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात वनखात्याच्या हद्दीत एका प्रेताचा पाय,व कवटी सापडल्याने खळबळ उडाली, ही बाब तात्काळ घोटी पोलिसांना कळविले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कायदेशीर प्रक्रिया हाताळली, दरम्यान त्या मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान १ जून २०२० रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यात एका युवकाची बेपत्ता असल्याची नोंद समजली त्यानुसार पोलिसांनी तपास करीत मृत युवकाची ओळख पटवली. २६ मे २० पासून हा मयत युवक बेपत्ता होता.बेपत्ता युवकाचे कपडे, व मयत युवकाच्या अंगावरील कपडे यावरून ओळख पटली. पुढील तपासात गावातीलच महिलेने तिच्या नातलगांतील लोकांच्या मदतीने हा खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या