शिक्षण,पोषण आहारापासून बालकांना वंचित ठेवू नका-अश्विनी आहेर

नाशिक । प्रतिनिधी

अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश हा ६ वषार्ंपर्यंतच्या बालकांना पोषण आहार पुरवणे आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण व सकस पोषण आहार मिळणे हा बालकांचा हक्क आहे. त्यापासून बालकांना वंचित ठेवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिला.कळवण तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवायोजनेतील ३१५ अंगणवाडी सेविकांची बैठक त्यांनी पंचायत समितीमध्ये घेतली.त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.

कुपोषण कमी करणे,महिला व बालविकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती व सेविकांमध्ये कुपोषण मुक्ती, बेटी बचाव-बेटी पढाव,’माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांविषयी सखोल चर्चा झाली. तसेच स्त्रियांना कराटे प्रशिक्षण, ब्युटीपार्लर प्रशिक्षण, शिवणकाम यासारखे व्यावसायिक प्रशिक्षणास देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन आहेर यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी अंगणवाडीसेविकांशी थेट संवाद साधला. थेट सभापतींशी संवाद साधता आल्यानेे अंगणवाडी सेविकांच्या चेहर्‍यावर समाधान झळकले.

याप्रसंगी कळवण पंचायत समिती सभापती मीनाक्षी चौरे, गट विकास अधिकारी बी. बी. बहिरम, बालविकास प्रकल्पाधिकारी लोखंडे व पर्यवेक्षिका उपस्थित होते.

‘क्षेत्रभेटी’अभिनव उपक्रम
सभापती आहेर यांनी क्षेत्रभेटी हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, अंगणवाडी सेविकांना केंद्रातील योजनांची माहिती देणे, अंगणवाडी केंद्र स्तरावरील अडीअडचणी समजावून घेणे व कुपोषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भेटी सुरू केल्या आहेत.अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर बोलावून घेण्यापेक्षा थेट आदिवासी प्रकल्पात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *