जिल्ह्यातील चौघांना पोलीस पदक

जिल्ह्यातील चौघांना पोलीस पदक

नाशिक । प्रतिनिधी

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील चार अधिकारी व कर्मचार्‍यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर  झाले आहेत. यात शहर आयुक्तालयातील दोन, ग्रामीणमधील एक तर राज्य गुप्त वार्ताच्या एका अधिकार्‍याचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाले असून शहर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मेहबुबअली जियाद्दीन सैय्यद यांना पोलीस पदक जाहीर झाले असून ते ३२ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. पंचवटी, गुन्हेशाखा, सरकारवाडा, भद्रकाली, देवळाली कॅम्प, मुंबईतील विशेष सुरक्षा विभागात त्यांनी सेवा बजावली आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असताना ५८ चोर्‍या, २९ घरफोडी, ८ दरोडे, २ खून असे अनेक गुन्हे उघडकीस आणले.

सैयद यांनी २५२ बक्षीस मिळवली असून २००४ साली गुन्हा उघडकीस आणण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांनी गौरविले आहे. तसेच राज्य गुप्ता वार्ता विभागातील अधिकारी बाबुराव दौलत बिर्‍हाडे यांना देखील पोलीस पदक जाहिर झाले आहे. बिर्‍हाडे हे १९८५ पासून पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी मालेगाव येथे संवेदनशिल काळात सेवा बजावत होते. तसेच १९९१ च्या घाटकोपर येथे उसळलेल्या दंगलीच्या वेळी अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना महत्वाची माहिती दिल्याने पुढील अनर्थ टळला होता. त्याचप्रमाणे ४०० हून अधिक बक्षीस पटकावले असून सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

२०१७ मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक मिळाले आहे. त्याचप्रमाणे सातपूचे संजय राजाराम वायचळे यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोध पथकातील विष्णु आर. गोसावी यांना पोलीस पदक जाहिर झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावत असताना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहेत. देशातील १०४० पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील ५४ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगिरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकार्‍यांना पोलिस शौर्य पदक, ४ पोलिस अधिकार्‍यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर  झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com