Thursday, April 25, 2024
Homeनाशिककांदा निर्यातीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे मध्यस्थी करावी

कांदा निर्यातीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे मध्यस्थी करावी

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे साकडे

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्रात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवावी, यासाठी केंद्र शासनाकडे आपण यशस्वी मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्याकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे नाशिक दौर्‍यावर असताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, प्रवक्ता शैलेंद्र पाटील यांनी त्यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ उठविणे गरजेचे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असून आवकही वाढली आहे. परिणामी कांद्याचे दर दिवसागणिक घटत आहेत. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठविणे हाच एकमेव पर्याय आहे. जेणेकरून कांद्याच्या दरात सुधारणा होऊन कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळतील.

यासाठी आपण केंद्र शासनाकडे यशस्वी मध्यस्थी करावी. सध्या ब्रह्मदेश व बांगलादेश येथे कांद्याला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहेत. मात्र, इकडे महाराष्ट्रातील कांद्याला अवघा १५ ते २० रुपये किलो दर मिळत आहे. निर्यातबंदीमुळे याचा फटका कांदा उत्पादकांना बसत असून अजूनही यापुढे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदी उठवावी, यासाठी आपण निकराचे प्रयत्न करावेत, अशी मागणीही संघटनेतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या