मूल्य आधारित पत्रकारितेतून सकारात्मक बदलांची अपेक्षा- डॉ. वैशाली बालाजीवाले
स्थानिक बातम्या

मूल्य आधारित पत्रकारितेतून सकारात्मक बदलांची अपेक्षा- डॉ. वैशाली बालाजीवाले

Abhay Puntambekar

पालखेड मिरचिचे । वार्ताहर

निर्भीड पत्रकारितेचा भूतकाळ अन् वर्तमानकाळाचे विश्लेषन करताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्या उद्देशाने पत्रकारितेकडे पाहिले, तोच उद्देश पत्रकारांनी मनात ठेवावा, असे प्रतिपादन ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले.
निफाड तालुका मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकारदिन सोहळ्यात ‘पत्रकारिता: सद्यस्थिती’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. वर्तमानपत्र हे संवादाचे माध्यम आहे. बदलते तंत्रज्ञान आणि या उद्देशाचे भान आपण ठेवायला हवे. मूल्ये व तत्त्व टिकवून पत्रकारिता करणे आवश्यक आहे. निर्भीड पत्रकारितेतून आपण समाजात नक्कीच बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष अतिथी माजी आ. अनिल कदम, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, मराठी पत्रकार परिषदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, पंचायत समिती उपसभापती शिवा सुरासे, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे उपस्थित होते.

.माजी आ. अनिल कदम म्हणाले, लोकशाहीतील खाचखळगे शोधून वास्तवाचे भान ठेवणारी पत्रकारिता अपेक्षित आहे. मूल्यावर आधारित उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन चांगल्या पद्धतीने केलेली पत्रकारिता विश्वासहार्य ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभापती सुवर्णा जगताप म्हणाल्या, पत्रकार समाज मनाचा आरसा आहे. महिला पत्रकारांची संख्या कमी असल्याने ती वाढावी. यावेळी पोलीस उपअधीक्षक माधवरेड्डी, उपसभापती शिवा सुरासे यांनीही मार्गदर्शन केले.

तुषार देवरेंच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मराठी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी यशवंत पवार यांची निवड झाल्याबद्दल तसेच दिवाणी न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्वेता घोडके, राधीका रहातेकर, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शरद नवले, पत्रकार पुरस्कार प्राप्त किशोर सोमवंशी, दीपक अहिरे, सुदर्शन सारडा यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक माणिक देसाई यांनी केले. स्वागत अ‍ॅड. रामनाथ शिंदे यांनी तर सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी समीर पठाण, जगन्नाथ जोशी, सागर निकाळे, सोमनाथ चौधरी, चंद्रकांत जगदाळे, योगेश अडसरे, दीपक घायाळ, आसिफ पठाण, दिलीप घायाळ तसेच शिवाजी ढेपले, दत्ता उगावकर, रामदास व्यवहारे, मधुकर शेलार, तनवीर राजे, संजय फोपळीया, संजय शिंदे, संजय आहेर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वाबळे, संजय गाजरे, महेश गिरी, पंकज श्रीवास्तव, अजय कुरवारे, बाळा खडताळे, सुनील निकाळे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com