सेवायोजन कार्यालयाला रिक्त जागांची माहिती न देणाऱ्या शासकीय, खाजगी आस्थापनांवर होऊ शकते दंडात्मक कारवाई

सेवायोजन कार्यालयाला रिक्त जागांची माहिती न देणाऱ्या शासकीय, खाजगी आस्थापनांवर होऊ शकते दंडात्मक कारवाई

बेरोजगारांना नियुक्ती मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल.

मुंबई | प्रतिनिधी 

खाजगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती ही सेवायोजन कार्यालयास (एम्प्लॉयमेंट ऑफिस) कळविणे किवा ही माहिती महास्वयंम पोर्टलवर देणे आवश्यक आहे. पण बरीच कार्यालये या नियमाची अंमलबजावणी करीत नाहीत. अशा आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने कळविले आहे.

सेवायोजन कार्यालयाचे (एम्प्लॉयमेंट ऑफिस) आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे. राज्यातील बेरोजगार युवक या कार्यालयाकडे आपल्या शैक्षणिक अर्हता आणि ईतर माहितीसह नोंदणी करतात. अशा नोंदणीकृत बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे सेवायोजन कार्यालयामार्फत शासनाकडील रिक्त जागी शिफारस केली जाते. त्यामुळे बऱ्याच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यात सेवायोजन कार्यालय महत्वाची भूमिका बजावते. यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि २५ पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास कळविणे कायद्यानुसार आवश्यक आहे. किंवा ही माहिती https://www.mahaswayam.gov.in/ या पोर्टलवर देणे आवश्यक आहे.

पण अनेक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापना या नियमाची अंमलबजावणी न करता वृत्तपत्रात जाहीरात प्रसिद्ध करुन थेट नियुक्तीद्वारे जागा भरतात, असे निदर्शनास आले आहे. यामुळे सेवायोजन कार्यालयाकडे नोदणी केलेल्या बेरोजगार तरुणांना रिक्त जागांवर शिफारस करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. यास्तव राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व २५ पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट ऑफिस) तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास कळवावी किवा ही माहिती महास्वयंम पोर्टलवर द्यावी, असे सूचीत करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com