द्वारका चौफुलीवरील भुयारी मार्गाचा पूर्णत: वापर होणार- विश्वास नांगरे-पाटील
स्थानिक बातम्या

द्वारका चौफुलीवरील भुयारी मार्गाचा पूर्णत: वापर होणार- विश्वास नांगरे-पाटील

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

गजबजलेल्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच असताना येथे उभारलेला भुयारी मार्गही गर्दुल्ल्यांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. मात्र आता, याप्रश्नी तोडगा काढला असून येथे गर्दुल्ल्यांना प्रवेश मिळणार नाही. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय)अधिकार्‍यांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावला आहे, त्यामुळे भुयारी मार्ग आता गजबजेल, असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी (दि. ३०) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पादचार्‍यांना द्वारका चौक सहज अन् सुरक्षित ओलांडता यावा, यासाठी लाखो रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला, मात्र या भुयारी मार्गाच्या तांत्रिक बाजूच्या त्रुटींमुळे पादचार्‍यांनी तो नाकारला आणि कालांतराने गर्दुल्ल्यांनी नशेडी खेळ सुरू करून त्याचा ताबा घेतला. त्यामुळे पादचारी पुन्हा जीव मुठीत धरूनच द्वारका चौक ओलांडू लागले. द्वारकेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक शाखेकडून केल्या जात आहेत.

यासाठी महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासनालाही विश्वासात घेतले जात आहे. भुयारी मार्गाची दुरवस्था प्रचंड प्रमाणात झालेली आढळून आली. तसेच त्यामध्ये अस्वच्छतेचे प्रमाण खूप असल्यामुळे पादचारी नागरिकांकडून भुयारी मार्गाचा वापर हळूहळू थांबविला गेला. मात्र आता पुन्हा भुयारी मार्ग वापरात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे, यासाठी प्राधिकरणाला विविध सूचना देण्यात आल्याचे नांगरे-पाटील म्हणाले. भुयारी मार्गाचा पादचार्‍यांनी सुरक्षेच्या कारणास्तव वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे

…असे पालटणार रूपडे
*भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
*पायर्‍यांची दुरूस्ती होणार
*मार्गातील पिवळे अंधुक दिवे काढून पांढरे लख्ख प्रकाश देणारे दिवे बसवणार
*न दिसणारे मार्गदर्शक व दिशादर्शक फलक काढून ठळक अक्षरांत सुटसुटीत फलक लावणार
* येत्या पंधरा दिवसांत महामार्ग प्राधिकरणाकडून विक्रेत्यांना व्यवसायास परवानगी दिली जाईल
* भुयारी मार्गाच्या प्रत्येक जिन्यासमोरील अतिक्रमण मनपाच्या मदतीने हटवणार.
*भुयारी मार्गात निर्भया पोलीस व भद्रकाली पोलीस ठाणे बिट मार्शलची नियमित गस्त राहणार
*गर्दुल्ल्यांवर पोलीसकारवाईचे आदेश

Deshdoot
www.deshdoot.com