चालु वर्षात जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय महाविद्यालय- टोपे
स्थानिक बातम्या

चालु वर्षात जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय महाविद्यालय- टोपे

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक तरतुदी पुर्ण केल्या जात आहे. चालू आर्थिक वर्षात आर्थिक तरतुद, आवश्यक त्या परवानगी घेऊन याच वर्षी महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न राहिल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

काल ना. टोपे हे नाशिक दौर्‍यावर आले असतांना त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यावेळी ना. टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयांमधील रुग्णांची सुविधासंदर्भात विचारपूस केली. त्याचबरोरब येथील डॉक्टर व पारिचारिकाची विचारपुस करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ना. टोपे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा असल्याने राज्यात जास्तीत जास्त डॉक्टर निर्मिती शासकीय महाविद्यालयांमधून व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे त्यादृष्टीने काम सुरु आहे. मात्र निधीची कमतरता असल्याने प्राधान्यक्रमाने महाविद्यालये उभारण्यात येतील. केंद्रीय योजनांचाही लाभ घेण्यात येईल व जास्तीत जास्त डॉक्टर निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न राहील असे ना. टोपे यांनी सांगितले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील उपकरणांची पाहणी ना. टोपे यांनी केली. तसेच रुग्णालयांमधील रिक्त पदांची चौकशी केली. तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचीही चौकशी त्यांनी केली. उत्तर महाराष्ट्रातील स्पेशालिस्ट रुग्णालय म्हणून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचा नावलौकीक असल्याचे टोपे यांनी सांगितले. निधीअभावी रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांची उपकरणे नादुरुस्त आहेत. जिल्ह्याच्या डीपीडीसी किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फतही रुग्णालयास निधी मिळत नाही.

यावर पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांच्या डीपीडीसीतून रुग्णालयासाठी निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. त्याचप्रमाणे बंद असलेली उपकरणे आठ दिवसांत सुरु करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेस दिले आहेत. रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी त्यांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास ना. टोपे यांनी दिला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामपल्ली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी डॉक्टर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com