छुपी कामगार कपात सहन करणार नाही-डॉ. कराड
स्थानिक बातम्या

छुपी कामगार कपात सहन करणार नाही-डॉ. कराड

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

मंदीचे सावट यावर्षी असले तरी मागील दहा वर्षाचा आढावा घेतला असता नफ्याचा आलेख चढता दिसून येत आहे. अश्या वातावररात मंदीचा फायदा घेत अनेक कारखानदारांनी कामगार कपात सुरु आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात २० हजाराहून अधिक कामगारांची कपात केल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली आहे.हे प्रकार सहन केले जाणार नसल्याचा इशारा भारतीय ट्रेड युनियन सेंटर (सीआयटीयु)े राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल कराड यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत कामगार उपायुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना डॉ. कराड म्हणाले की, बहुतांशी शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले असून उरलेले कर्जही सरकारने तातडीने माफ करावे. त्याचप्रमाणे मंदीचे कारण देत औद्योगिक क्षेत्रात बेरोजगार झालेल्या कामगारांचेही कर्ज नव्या ठाकरे सरकारने त्वरीत माफ करावे

गेल्या दहा वर्षातील कारखानदारांच्यावतीने भरलेल्या विविध कराचे (टॅक्स) मुल्यनापन केल्यास मंदीचे कारण स्पष्ट होईल. परदेशा धर्तीवर येथील बेरोजगार कामगारांना भत्ता देण्यात यावा. नव्या सरकारने राज्यातील विविध कामगार संघटनांची बैठक घेत कामगारांचे प्रश्न समजावून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.लघु व मध्यम बाधीत उद्योजकांनाही सरकारने मदत करावी अशीही मागणी करण्यात आली.यावेळी नाशिक जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या कामगारांच्या समस्यांचे निवेदन कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून कामगार उपस्थित होते.

तर नव्या वर्षात नवा संघर्ष 
जिल्हाभरातील सुमारे २० कारखान्यांमधील कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले आहे. या मागण्यांची पुर्तता ३१ डिसेंबरपुर्वी न झाल्यास नविन वर्षात नविन संघर्ष पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी डॉ. कराड यांनी दिला आहे.

१० हजार कामगार रस्त्यावर
कामगारांच्या मागण्यांची पुर्तता न झाल्यास येत्या ८ जानेवारीला १० हजार कामगार रस्त्यावर उतरणार आहे. सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालय असलेल्या इमारतीला घेराव घालत शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

भ्रष्ट अधिकार्‍यांची साफसफाई
गेल्या २४ तासात तीन पोलिस अधिकार्‍यांवर लाचलुचपत विभागाच्या कारवाईतून जिल्ह्यात- राज्यात भ्रष्टाचार बोकाळल्याच चित्र आहे. काहीअंशाने का होईना पोलिस खात्यातील भ्रष्ट अधिकार्‍यांची साफसफाई सुरु झाली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डॉ.कराड यांनी यावेळी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com