Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोना विषाणूशी लढा देण्यासाठी जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सज्ज

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सज्ज

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आतापर्यंत २६ संभाव्य करोना संशयितांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे नाशिककरांनी घाबरून न जाता स्वच्छतेसह योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महापालिका, पोलीस, अन्न व औषध प्रशासन अशा सर्व यंत्रणा एकत्रित काम करून करोनामुळे निर्माण होणार्‍या स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. नाशिकमध्ये अद्याप एकही रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. काळजी घेतली आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अचूकपणे अवलंब केला, तर आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.

करोना विषाणू संसर्ग होण्यापासून ते लक्षणे प्रकट होईपर्यंतचा काळ हा साधारणपणे २ ते १४ दिवसांचा असतो. या काळात संक्रमित व्यक्तीकडून लक्षणे व्यक्त न होताही इतरांना विषाणूंचे संक्रमण केले जाऊ शकते, ही शक्यता सध्याच्या काळी नाकारता येत नाही. करोना विषाणूंचा फैलाव होत असलेल्या ठिकाणी राहाणारे, त्या ठिकाणी जाणारे अशा व्यक्तींना संक्रमणाचा धोका जास्त असतो. यामुळे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणे, गर्दी होणारे सिनेमा हॉल, मॉल, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

सध्या तरी करोना विषाणू संसर्गावर लस किंवा प्रतिविषाणू (अँटिव्हायरल) औषध उपलब्ध नाही आणि यावर उपचार म्हणून प्रतिजैविके उपयुक्त नाहीत. तरीही आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून करोनावर मात करता येत आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल आणि ताप, घसादुखी वगैरे लक्षणांमुळे मनात संसर्गाची शंका येत असेल, तर संक्रमक आजारांवरील उपचार-सिद्धता असणार्‍या शासकीय आरोग्यकेंद्रात जाऊन तेथील डॉक्टरांना भेटा.

डॉक्टरांच्या सुचनेनुसार उपचार सुरू करा. गरज असल्यास रुग्णालयात भरती व्हा. यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात माहिती द्यावी. ज्या ठिकाणी यावर उपचार सुरू आहेत अशा रुग्णालयात त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात येत आहेत. यासाठी १०८ अ‍ॅम्बुलन्सच्या काही खास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अशी आहे सज्जता
जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण नाही. परंतु परिस्थिती उद्भवल्यास ६० रुग्णांवर एकाचवेळी उपचार करण्यासाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयात १६, महापालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात १५, आडगाव येथील डॉ. पवार आरोग्य महाविद्यालय-रुग्णालयात १२ मालेगाव शासकीय रुग्णालय ५, खासगी अपोलो २ व अशोका २ अशी राखीव व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संशयित रुग्णांना स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी तपोवन येथे १०० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

परदेशातून आलेल्या ११४ रुग्णांवर देखरेख
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने सध्या राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून अधिक उपाययोजना राबविल्या जात आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यात परदेशातून आलेले आजमितीस जिल्हा आरोग्य व महापालिका आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली ११४ नागरिक आहेत. या नागरिकांची १४ दिवसांपर्यंत नियमित तपासणी केली जाते आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक नागरिक हे दुबईतून आलेले आहेत. ही संख्या सुमारे ५० आहे. हे सारे नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत.

या देशातील नागरिकांवर आहे लक्ष
चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, युनायटेड अरब युनिवर्स (यूएई).

- Advertisment -

ताज्या बातम्या