Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकारी बैठक : मुद्रालोन, आधार सेवेवरून बँकांना सुनावले

जिल्हाधिकारी बैठक : मुद्रालोन, आधार सेवेवरून बँकांना सुनावले

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुद्रायोजना लाभार्थ्यांचा बँकाकडे कोणताही डाटा नसून बँकांकडून अर्जदारांना कोणतीही माहिती दिली जात नाही. तसेच, एक वर्ष झाले तरी बँकांकडून अनेक तालुक्यांमध्ये आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले नाही. या बाबतच्या तक्रारी प्राप्त होत असून बँकांनी त्यांच्या कामकाजात सुधारणा करावी; अन्यथा आरबीआयकडे तक्रार केली जाईल, या शब्दात खा.भारती पवार व खा.हेमंत गोडसे यांनी बँक प्रतिनिधींना सुनावले.

- Advertisement -

प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी.एस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२१) जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. टावरे व खासगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुद्रा लोन, कॅशलेस योजना, स्टार्टअप इंडिया, आधारकार्ड, विविध योजनांसाठी कर्जपुरवठा आदी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण दस्तऐवज असते. मात्र, बँकांनी तालुकास्तरावर आधारकार्ड देण्याची सुविधा द्यावी,असे आदेश देण्यात आले होते. मात्र, स्टेट बँक इंडियाकडून अद्याप निफाडला आधार केंद्र सुरू करण्यात आले नाही. पेठ, नांदगाव, त्र्यंबक, निफाड यासह नऊ तालुक्यांत बँकांनी अद्याप आधारसेवा केंद्र सुरू नसल्याचे समोर आले. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी.एस व खासदारांनी नाराजी व्यक्त केली. एक महिन्यात बँकांनी आधारसेवा केंद्र सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले.

मुद्रालोन या योजनेची अद्यावत माहिती बँकांकडे नसल्याचे बैठकीत समोर आले. बँकांकडून नागरिकांना या योजनेची माहिती दिली जात नाही. बँक प्रतिनिधींचा मुद्रा लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात यांची माहिती नसल्याचे उघड झाले. जिल्ह्यात तालुकानिहाय मुद्रालोन योजनेचे किती लाभार्थी आहेत, किती अर्ज प्राप्त झाले, किती लोन प्रकरणे मंजूर झाली; याची आकडेवारी बँक प्रतिनिधी बैठकीत सादर करू शकले नाही.

तसेच, असा डाटा देणे शक्य नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे खा.गोडसे व खा.पवार यांनी बँकांना झापले. या योजनेचा सविस्तर तपशील सादर करा, अशी सूचना त्यांनी बँक प्रतिनिधींना केली. ऑनलाईन पोर्टलवर मुद्रा योजनेची माहिती दिली जावी, असे त्यांनी आदेशित केले. बँकांनी या योजनेची नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी यांनी दिला.

बँकांसाठी दिलेल्या सूचना
– १४ बँकांची अनुपस्थिती; कारवाई करा
– ‘मुद्रा’ योजनेची गावपातळीवर जनजागृती करा
– कॅशलेस गाव योजनेची माहिती सादर करा
– आधारसेवा देण्यास नेटवर्कची अडचण सांगू नका
– स्टार्ट इंडियाची माहिती द्या
– योजना न राबवल्यास कारवाई केली जाईल

- Advertisment -

ताज्या बातम्या