अवनखेड परिसरात द्राक्षबागेवर उकड्याचा प्रादुर्भाव
स्थानिक बातम्या

अवनखेड परिसरात द्राक्षबागेवर उकड्याचा प्रादुर्भाव

Abhay Puntambekar

अवनखेड । श्रीराम देवकर

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड परिसरात द्राक्षबागेवर उकड्याचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
येथे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चालुवर्षी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. बेमोसमी पाऊस, ढगाळ वातावरण, थंडी अशा संकटांना तोंड देवून शेतकर्‍यांनी तारेवरची कसरत करुन द्राक्षपीक वाचविले. त्यात शेतकर्‍यांचा फवारणी खर्च दरवर्षी पेक्षा ३० टक्क्यांनी जास्त झाला.

परंतु वातावरणात होणारा रोजच बदल शेतकर्‍यांची डोकेदुखी ठरला आहे. कधी कधी अचानक थंडी वाढते तर कधी खुप ऊन वाढते. त्यामुळे अचानक वाढलेल्या उन्हामुळे द्राक्षांवर उकड्याचे नविनच संकट शेतकर्‍यांपुढे निर्माण झाले आहे. १५ ऑक्टोबर नंतर छाटणी केलेल्या द्राक्षबागेवर उकड्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. औषधांची फवारणी करुन सुध्दा त्याचा फारसा परिणाम होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उकड्या रोग आल्यामुळे प्रत्येक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सततच्या हवामानात होणार्‍या बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. तरी शासनाने संपूर्ण सरसकट कर्जमाफी देवून शेतकर्‍यांना कर्जमुक्त करांवे व परत शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे.

चालूवर्षी द्राक्ष शेतकर्‍यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. द्राक्ष छाटणीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्‍यांना मोठा आर्थिक खर्च येतो. काही शेतकर्‍यांचा खर्च सुध्दा निघत नाही. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने दिलेली २ लाखापर्यंत कर्जमाफीही तुटपूंजी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
सागर जाधव- शिवसेना ग्राहक कार्यालयीन प्रमुख

निसर्गाच्या हवामान बदलामुळे, कधी बेमोसमी पाऊस, अती थंडी, औषधांचे आणि खतांचे वाढलेले भाव,अशा अनेक कारणांमुळे शेतकरी द्राक्षपिकांपासून लांब जात चालला आहे. तरी शासनाने द्राक्षांसाठी लागणार्‍या औषधांच्या किंमती आणि खताचे भाव कमी करावे आणि द्राक्षाला हमीभाव द्यावा.
केशव कोंडाजी जाधव, द्राक्ष उत्पादक, शेतकरी, अवनखेड

Deshdoot
www.deshdoot.com