अखेर म्हाळसाकोरेचा वीजपुरवठा सुरळीत
स्थानिक बातम्या

अखेर म्हाळसाकोरेचा वीजपुरवठा सुरळीत

Abhay Puntambekar

म्हाळसाकोरे। वार्ताहर

गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफार्मर चार दिवसांपासून नादुरुस्त झाल्याने गावाचा वीजपुरवठा खंडीत होवून पाणीपुरवठा योजना, पिठ गिरण्या बंद पडून शालेय विद्यार्थ्यांना ऐन परिक्षा काळात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. दै. देशदूतने याबाबत मंगळवार दि.२१ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच विजवितरण यंत्रणा खडबडून जागी झाली अन् त्याच दिवशी सायंकाळी गावात वीजपुरवठा सुरळीत झाला. देशदूतने याप्रश्नी ठोस भुमिका निभावल्याने ग्रामस्थांनी देशदूतचे अभिनंदन केले आहे.

येथील राजवाडा डी.पी. नं.1 वरील तिनही ट्रान्सफार्मर एकाच वेळी बंद झाल्याने शुक्रवारपासून संपुर्ण गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वीजवितरण कर्मचारी, अधिकारी यांचेशी संपर्क साधून देखील ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारुन नेली जात होती. विशेष म्हणजे पुढील महिन्यात १० वी व १२ वी विद्यार्थ्यांच्या परिक्षा असल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता.

गावातील पिठ गिरण्या बंद पडल्या. संपुर्ण गावात अंधाराचे साम्राज्य तयार झाले होते. चार दिवसानंतरही वीजपुरवठा होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने ग्रामस्थांनी देशदूत प्रतिनिधीकडे कैफियत मांडली. तर देशदूत प्रतिनिधीने म्हाळसाकोरे कनिष्ठ अभियंता मनिषा वसाने यांचेशी संपर्क साधून विजप्रश्नावर विचारणा केली. त्यांनीही ट्रान्सफार्मर शिल्लक नसल्याचे सांगितले.  देशदूतने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले.

परिणामी, या वृत्ताची वीजवितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेत लागलीच त्याच दिवशी नवीन ट्रान्सफार्मर पाठवून मंगळवारीच सायंकाळी ६ वाजेपर्यंत गावाचा बंद पडलेला विजपुरवठा सुरळीत केला. तब्बल चार दिवसानंतर अंधारात असलेले गाव वीजपुरवठा सुरळीत झाल्याने विद्युत दिव्यांनी उजळून निघाले. खंडीत वीज पुरवठ्याबाबत देशदूतने याप्रश्नी आवाज उठविल्याने दै. देशदूत आमच्यासाठी देवदूत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त करुन दै. देशदूतचे अभिनंदन केले.

Deshdoot
www.deshdoot.com