नायलॉन मांज्याच्या उत्पन्नासह वापरावर बंदी असूनही सर्रास विक्री
स्थानिक बातम्या

नायलॉन मांज्याच्या उत्पन्नासह वापरावर बंदी असूनही सर्रास विक्री

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

पतंगोत्सवासाठी वापरला जाणार्‍या नायलॉन मांज्याच्या उत्पन्नासह वापरावर पूर्णत: बंदी असताना शहरात त्याची छुप्या पद्धतीने जोरदार विक्री सुरू आहे. काही ठराविक विक्रेत्यांकडूनच नायलॉनचे समर्थन केले जात असून पोलीसदेखील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविण्याचा आनंद, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नायलॉन मांजाने अनेकांच्या जीवावर संक्रांत आणली आहे. त्यामुळे नायलॉन मांजा निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली. स्थानिक पोलिसांकडून छापे टाकून गुन्हेही दाखल करण्यात आले असले तरी एकूण सामाजिक उदासिनतेमुळे नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पशु-पक्ष्यांचा जीवच धोक्यात आला आहे. त्यामुळे नायलॉन मांजाविरोधातील बंदी कागदावरच असून चोरी छुप्यारितीने सर्रासपणे विक्री सुरू असल्याने मनुष्यासह प्राणीमात्रांच्या जीवावरची संक्रांत सामाजिक उदासिनतेमुळे कायम आहे.

राष्ट्रीय हरितलवादाने नायलॉन मांजावर बंदी घातली. मुंबई उच्च न्यायालयाने नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी आणून कठोर कारवाईचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाकडूनही नायलॉनच्या उत्पादन आणि वापरावर बंदी असल्याचे आदेश पारित झाले आहेत. तर पोलिसांकडून विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई केली जात आहे. तरीही नायलॉन मांजा विक्री थांबलेली नाही. उलट चोरीछुप्या मार्गाने विक्री सुरूच आहे. पतंगोत्सवात सिन्नरमध्ये नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरून तब्बल ३५ टाके घालावे लागल्याचा गंभीर प्रकार घडला. तर गेल्यावर्षी पंचवटीत १० वर्षांचा मुलगा वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढताना शॉक लागून दगावला होता. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

नायलॉन मांजा अन् लोंबकळत्या तारा
शहर परिसरात नायलॉन मांज्याची सर्रास विक्री होते. तर याच परिसरामध्ये वीजतारा भूमिगत नसल्याने ठिकठिकाणी त्या धोकादायकरित्या लोंबकळलेल्या आहेत. पतंग कटल्यानंतर मांजासह ती तारांना अडकते आणि ती पतंग घेण्याचा मोह चिमुकल्यांना आवरत नाही. गेल्या वर्षी १० वर्षांचा मुलगा पंचवटीत पतंग काढताना विजेचा शॉक बसून मृत्युमुखी पडला होता. दरवर्षी या लोंबकळत्या तारांमुळे दुर्घटना घडतात. तर, नायलॉन मांजा झाडामध्ये अडकून राहिल्याने त्याचा पक्ष्यांना फास बसून ते दगावतात.

शाळांमध्ये जनजागृती
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पोलीस-पक्षीप्रेमींकडून संयुक्तरित्या शाळा-महाविद्यालयांमध्ये नायलॉन मांजाविरोधात जनजागृतीपर प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. मुलांमध्येच पतंग उडविण्याची इच्छा अधिक असल्याने याच वर्गाला लक्ष्य करून राबविलेल्या उपक्रमांतून सकारात्मक परिणाम दिसून आला असला तरी, त्यात १०० टक्के यश आलेले नाही. लहानग्यांसह तरूणाईनेदेखील नायलॉन मांज्याचा वापर टाळावा, असे आवाहन ‘देशदूत’ने केले आहे.

डझनभर गुन्हे दाखल
गेल्यावर्षी (२०१८) नायलॉन मांजासंदर्भात १२ गुन्हे दाखल होते. तर यंदा ९ गुन्हे दाखल झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात एकूण २१ ते २२ गुन्हे दाखल असून हजारो रुपयांचा नायलॉन मांज्यांचे गट्टू जप्त केले आहेत. अंबड, पंचवटी, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली आहे. तरीही जेलरोड, जुने नाशिक, भद्रकाली, सिडको, वडाळागाव, नाशिकरोड, टाकळीरोड या परिसरामध्ये नायलॉन मांजाचा वापर करून मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात.

Deshdoot
www.deshdoot.com