Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक‘महापरीक्षा पोर्टल’ बंदचे स्वागत

‘महापरीक्षा पोर्टल’ बंदचे स्वागत

स्पर्धा परीक्षार्थींमध्ये समाधानाची भावना

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्य सरकारचे सर्व प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अखत्यारीतील कार्यालयातील गट ब आणि गट क पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे स्पर्धा परीक्षार्थींनी स्वागत केले असून नव्याने सुरू केल्या जाणार्‍या भरती पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महापोर्टलद्वारे सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेतील त्रुटींबाबत राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, यापुढे नोकर भरती प्रक्रियेसाठी नवीन पद्धत आणली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणार्‍या महापरीक्षा पोर्टलच्या पारदर्शकतेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात होते. यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची जोरदार मागणी दोन्ही काँग्रेसने व विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. शासनाच्या विविध विभागाच्या गट क आणि गट ड सवंर्गातील पदांची परीक्षा राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन सर्व्हिस प्रोव्हायडरची यादी तयार करण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात येईल. त्यानुसार त्या यादीतील निवड झालेल्या कंपन्यांकडून संबंधित विभागास पदभरतीसाठी परीक्षा आयोजित करता येईल.

जाहिरात ते निवड प्रक्रियेचे संचलन संबंधित विभागाच्या पातळीवर होईल. यात महाआयटीची भूमिका मर्यादित कामासाठी राहील. तसेच सध्याच्या परिस्थितीत ज्याप्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अथवा परिक्षेचे आयोजन बाकी आहे. अशा प्रकरणी त्या त्या संबंधित विभागांना सर्वआवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

महाआघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाची विद्यार्थी वाट बघत होते. दोन्ही काँग्रेसने निवडणुकीचा प्रचार करताना सरकार सत्तेत आल्यावर हे पोर्टल बंद करेल, असे आश्वासन दिले होते, ते त्यानी पूर्ण केले आहे. आता लवकरात लवकर महाभरती घेऊन स्पर्धा परीक्षेचा गांभीर्याने अभ्यास करणार्‍या परीक्षार्थींना न्याय द्यावा ही अपेक्षा.
-नवीन कमोद, मुंबई नाका, नाशिक.

सरकारने महापोर्टल बंद केले हा निर्णय परिक्षार्थींंसाठी सागतार्ह आहे. या पोर्टलच्या भ्रष्ट कारभारामुळे पात्र उमेदवारांंस डावलले जात होते. मात्र नव्याने होणार्‍या भरती पद्धतीमुळे पात्र उमेदवाराची निवड होण्यास मदत मिळेल, असा विश्वास वाटतो. फडणवीस सरकारने केलेले उद्योग या महाआघाडीने करू नये, ही अपेक्षा
-चिन्मय दहीदे, सटाणा

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना महाविकास आघाडीकडून जी अपेक्षा होती ती सरकारने पूर्ण केली, आता परीक्षेत होणारा गैरकारभार बंद होईल आणि अभ्यास करणार्‍या विद्यार्थांचाच फायदा होईल.
-भारत सोनवणे, नाशिक.

महापरीक्षा पोर्टलमध्ये काही एजंट उमेदवाराकडून १५ ते २० लाख रुपये घेतात. ज्यांनी अंत:करणापासून अभ्यास केलेला असतो, त्याचें मेरिटमध्ये नाव येत नाही. ज्यांनी पैसे भरले त्याचा नंबर लागतो. गुणवत्ता असून देखील त्याला अपयश पचवावे लागते. परीक्षा ऑनलाईन असल्याने त्यात बरेच काही करता येते. महापोर्टल बंद कण्याबाबत सरकारने चांगला निर्णय घेतला आहे.
जान्हवी दहिदे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या