नाताळ सणाचा उत्साह शिगेला
स्थानिक बातम्या

नाताळ सणाचा उत्साह शिगेला

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकरोड परिसरात ख्रिसमस म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणाचा उत्साह दिसून येत आहे. काल मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. परिसरात ख्रिस्ती बांधवांमध्ये अलोट उत्साह असून घरांवर आकाशकंदील लावण्यात आले आहेत. चर्चंमध्ये रोषणाई व सजावटीसह इंग्रजी शाळांमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे साकारण्यात आले आहेत.

जेलरोडच्या संत अण्णा महाचर्चमध्ये बिशप ल्युडस डॅनिएल काल नाताळचा शुभसंदेश दिला. यावेळी फादर पीटर डिसुजा, फादर सचिन मनतोडे आदी उपस्थित होते. रात्री १० वाजता नाताळ गीते , पवित्र मिसा (प्रार्थना) झाली. आज (दि. २५) सकाळी ८ वाजता फादर पीटर डिसूजा, फादर सचिन मनतोडे यांच्या उपस्थितीत पवित्र मिसा होईल.

दि. २६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक सहभागी होतील. दि. २७ रोजी सकाळी १० वाजता आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन चर्चेमध्ये आणण्यात येईल. त्यांच्यासाठी प्रार्थना व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. २८ रोजी सकाळी बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दि. ३० रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी विशेष कार्यक्रम होईल.

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर येथील सेंट झेवियर्स शाळेत बाळ येशू मंदिर आहे. तेथे फेब्रुवारीत भरणार्‍या यात्रेत देश-परदेशातून भाविक येतात. नाताळनिमित्त बाळ येशू मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे. फादर ट्रेव्हर मिरांडा यांच्या उपस्थितीत काल मध्यरात्रीपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली.

मुक्तिधामसमोर दि. १ मे १९३८ मध्ये सेंट फिलीप चर्चची स्थापना करण्यात आली. तेथे नाताळनिमित्त आठवडाभर कार्यक्रम होणार आहेत. प्रिस्ट इन चार्ज रेव्ह. प्रवीण घुले मार्गदर्शन करुन शुभसंदेश देणार असून सचिव सायमन भंडारे, खजिनदार प्रदीप जाधव, रुपेश निकाळजे, सुभाष श्रीसुंदर, अतुल घोरपडे, प्रविण निर्मळ, बेंजामीन निकाळजे आदींसह भाविक उपस्थित राहणार आहेत.

येथे ख्रिस्त जीवनावर आधारित देखावे तयार करण्यात आले आहेत. काल मध्यरात्री कॅन्डल मार्च झाल्यानंतर, आज (दि. २५) ख्रिस्त जन्मोत्सव व सणाची भक्ती, दि. २६ ला बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. विशेष म्हणजे दि. २७ रोजी सायंकाळी ७ वाजता राज्य-परराज्यातील शंभर कलावंतांचे पथक उपनगर येथे ख्रिस्त जन्मावरील महानाटिका सादर करणार आहेत.

दि. २८ रोजी सकाळी १० वाजता निर्दोष बालकांचा सण होईल. दि. २९ ला आऩंद मेळावा, दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता युवकांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, दि.१ जानेवारीला नवीन वर्षाची भक्ती गीते, दि. २ रोजी महिला मंडळाचा कार्यक्रम, दि. ३ रोजी गिफ्ट बॉक्सव्दारा लहान मुले जीवनावश्यक वस्तू जमा करुन या वस्तू निराधार मुलांना वाटणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com