मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले ‘शिवभोजन’ आवडले का ?
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले ‘शिवभोजन’ आवडले का ?

Abhay Puntambekar

वडाळा नाका केंद्राला भेट : नागरिकांशी साधला संवाद

जुने नाशिक । प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.१६) वडाळानाका येथील शिवभोजन केंद्रास अचानक भेट देत शिवभोजन थाळीचा आस्वाद घेणार्‍या नागरिकांशी संवाद साधला. तुकाराम नाडे यांना थाळी आवडली का? याबाबत विचारणा करत अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत तुम्ही समाधानी आहात ना? याबाबत तेथील नागरिकांना विचारणा करून त्यांची मते जाणून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांनी भेट देत विचारपूस केल्याने थाळीचा आस्वाद घेणार्‍यांसाठी हा सुखद धक्का ठरला.

सत्तेत आल्यास गोरगरिबांना दहा रुपयात भोजन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. राज्यात शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शिवभोजन थाळीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये समावेश केला. २६ जानेवारीपासून राज्यभरात ही थाळी सुरू झाली. नाशिक शहरातही तीन ठिकाणी व मागील आठवड्यात वडाळा नाका येथील हॉटेल साईप्रीतममध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले.

न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळात वेळ काढून वडाळा नाका येथील केंद्राला भेट दिली. थाळीचा आस्वाद घेत असलेल्या नागरिकांशी ठाकरे यांनी संवाद साधला. थाळीची चव आवडली का, सहजतेने थाळी उपलब्ध होते ना, अन्नपदार्थाचा दर्जा कसा हे, स्वच्छता आहे ना, याबाबत विचारपूस केली.

थेट मुख्यमंत्री ठाकरे हे भेट देऊन संवाद साधतील, अशी पुसटशी कल्पना तेथे भोजनासाठी आलेल्या नागरिकांना नव्हती. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत मते जाणून घेतल्याने थाळीचा आस्वाद घेणार्‍यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार, माजी खासदार समीर भुजबळ हे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com