महाराष्ट्र पोलीस अकादमीत अत्याधुनिक मैदाने; १३ कोटींंच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र पोलीस अकादमीत अत्याधुनिक मैदाने; १३ कोटींंच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्राचा मानबिंदू आणि नाशिकनगरीचा गौरव म्हणून संबोधल्या गेलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीला अधिक अत्याधुनिक करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात अकादमीत प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना अत्याधुनिक असे हॉलीबॉल, हॉकी मैदान व धावण्याचा ट्रॅक तयार करण्यासाठी सुमारे १३ कोटींच्या खर्चाला प्रशासकिय मान्यता राज्य शासनाने नुकतीच दिली आहे. यामुळे लवकरच याठिकाणी सुसज्ज अशी मैदाने होणार आहेत.

शंभर वर्षाहून अधिक काळापासून देशाला आणि राज्याला सक्षम पोलीस अधिकारी व शासकिय अधिकारी घडविण्याचे काम करणार्‍या महाराष्ट्र पोलीस अकादमीला अधिक अत्याधुनिक करण्याचे काम राज्य शासनाकडून अलिकडच्या काळात झाले आहे. अत्याधुनिक ग्रंथालय, पोलीस दल इतिहास संग्रहालय, सायबर लॅब यांच्यासह अत्याधुनिक सेवा अकादमीत कार्यरत झाल्यानंतर आता याठिकाणी असलेल्या मैदानांना अत्याधुनिक रुप देण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच गृह विभागाने घेतला आहे.

अनेक वर्षापासून अकादमीच्या जुन्या खेळांच्या मैदानाना अत्याधुनिक रुप देण्यासाठी गृह विभागाने याठिकाणी सिंथेटीक ट्रॅक, अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तयार करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आता याठिकाणी प्रशिक्षण घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना चांगल्या प्रकारे खेळात प्राविण्य मिळविता येणार असून यातून शरीर तंदुरुस्त ठेवता येणार आहे.

गृह विभागाने गेल्या १८ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र पोलीस अकादमीसाठी ४ कोटी ९७ लाख ७५,७२८ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या खर्चातून आता याठिकाणी ४०० मीटरचा धावण्याचा सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच अकादमीत ३ कोटी ३६ लाख ४०,४५५ रुपये खर्चाचे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान आणि ४ कोटी ७२ लाख ४४,१४० रुपये खर्चाचे अ‍ॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान अशाप्रकारे खर्चास प्रशासकिय मान्यता दिली आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन याचा फायदा प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकार्‍यांना होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com