मार्चमध्ये होणार शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा
स्थानिक बातम्या

मार्चमध्ये होणार शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा

Abhay Puntambekar

कर्जमुक्ती याद्या होणार शुक्रवारी प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असणार्‍या खातेदारांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात राष्ट्रीयकृत बँका अजूनही पिछाडीवरच असल्याचे समोर आले आहे. अपलोड झालेल्या याद्यांपैकी नमुना यादीचा २१ फेब्रुवारीचा मुहूर्त हुकला असून या याद्या आता २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याबाबतचा आदेशही शासनाने काढला आहे. आता या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. २ लाख रुपयांपर्यंत कर्ज थकित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांची संख्या एक लाख आठ इतकी आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदारांची संख्या जवळपास ३६ लाख इतकी आहे. योजनेची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीला लेखापरीक्षकांना विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये पाठवून कर्जदाराचे कर्ज आणि आकारलेले व्याज बरोबर आहे किंवा नाही याबाबतीत खातरजमा करून घेण्यात आली. त्यानंतर या सार्‍याच खातेदारांचे बँक खाते आधारला लिंक करून घेण्यात आले. अशा खातेदारांच्या याद्या १ फेब्रुवारीपासून पोर्टलवर अपलोड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जिल्हा बँकेने सुरुवातीच्या काही दिवसांत सर्व खातेदारांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका मात्र याकामी पिछाडीवरच असल्याचे दिसून आले. अत्यंत धीम्या गतीने काम सुरू असल्याने अजूनही बर्‍याचशा खातेदारांच्या याद्या अपलोड झालेल्या नाहीत. प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात पोर्टलवर अपलोड झालेल्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायट्या, चावडी आदी सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर संबंधित खातेदारांना झालेली कर्जमाफी मान्य आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यात येणार आहे. मान्य असल्यास अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. तसेच हरकत असल्यास तीही नोंदवता येणार आहे. त्यानंतरच सरकारी पातळीवरून कर्जमाफीचे पैसे जमा केले जाणार आहेत. या याद्या सार्वजनिक ठिकाणी २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com