करोना संसर्ग वाढीच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहावे – अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.नितीन करीर

करोना संसर्ग वाढीच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहावे – अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.नितीन करीर

जिल्ह्यातील करोना संसर्ग नियंत्रणात

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील करोना संसर्ग सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात असून येणाऱ्या काळात संभाव्य संसर्ग वाढण्याची सार्वत्रिक शक्यता विचारात घेऊन यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिल्या आहेत. करोनासह जगण्याची जीवनशैली स्वीकारताना संसर्ग हा कमी-अधिक होत राहणार असल्याने यासंदर्भातील दूरगामी नियोजन करणे आवश्यक आहे असेही डॉ. नितीन करीर यांनी सांगितले.

डॉ. करीर यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला असून त्यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून आज नाशिक व जळगाव जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करत असताना डॉ. करीर बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामिण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. करीर म्हणाले, आगामी काळात जशी अनलॉक डाऊनची व्याप्ती वाढत जाईल तसतसे लोक प्रवास करतील, फिरतील, एकमेकांच्या संपर्कातही येतील. त्यातुन संसर्गही वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत करोनाशी आपला सुरू असलेला सामना सुरूच ठेवावा लागेल किंबहुना तो अधिक प्रभावी करावा लागेल. या आजाराबाबत जनमानसात असलेले गैरसमज व अनाठायी भीती दूर करावी लागेल. संख्यात्मक माहितीची मांडणी सकारात्मकरीत्या केली गेल्यास या आजाराबद्दल भीती दूर होईल असा आशावाद देखील डॉ. करीर यांनी व्यक्त केला.

कोविड संसर्गानंतर बरे होणारे रुग्ण, रुग्णालयात अधिक काळ राहणारे रुग्ण, रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रुग्ण तसेच मृत्यू पावणारे रुग्ण या सर्व प्रकारांचे सविस्तर विश्लेषण करणे गरजेचे आहे. जिल्हा, शहर, गावात किती रूग्ण संख्या आहे याला महत्व नसून संसर्ग झालेल्या रुग्णांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जात आहे विशेषतः अतिदक्षता विभागातील रुग्णांचे व्यवस्थापन किती प्रभावी आहे हे अधिक महत्त्वाचे आहे असेही यावेळी डॉ. करीर यांनी सांगितले. त्यामुळे अतिदक्षता विभागातील व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करून तेथे अनुभवी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे डॉ करीर यांनी सांगितले.

नाशिक जिल्हयात सध्या स्वॅब टेस्टिंग सध्या २४ ते ४८ तासात होत आहे ही चांगली बाब असून यापेक्षाही हा कालावधी कमी करून त्या त्या दिवशी टेस्टिंग कशाप्रकारे करून घेता येईल याबाबत अधिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा डॉ करीर यांनी व्यक्त केली. टेस्टिंग मध्ये आयसीएमआर च्या मापदंडानुसार पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीची न चुकता तपासणी करावी अशा सूचना डॉ करीर यांनी केली.

त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक तसेच प्रत्यक्ष करोना संबंधित अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांचे समवेत त्या विभागातील कामकाजाचा स्वतंत्र सविस्तर आढावा डॉ. करीर यांनी घेतला. यामध्ये आजपर्यंत अतिदक्षता विभागात दाखल झालेले रुग्ण, त्यांना देण्यात आलेले उपचार व त्यापैकी बरे झालेले रुग्ण तसेच मृत रुग्णांच्या मृत्यूची कारणमीमांसा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणेत आली. यासंदर्भातील सविस्तर विश्लेषण तसेच सांख्यिकी माहिती विचारात घेऊन जिल्ह्यातील अतिदक्षता विभागात उपचार घेताना व्हेंटिलेटरची गरज पडूनही जवळपास ६० टक्के रूग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण अतिदक्षता विभागातून बरे होणाऱ्या सर्वसाधारण मापदंडाच्या तुलनेत चांगले असल्याचे मत डॉ. करीर यांनी व्यक्त केले. या विभागात काही सामुग्री आवश्यक असल्यास ती प्राप्त करुन घ्यावी, अश्या सूचनाही डॉ. करीर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या.

आता पावसाळा सुरू झाला असून सर्दी, खोकला, थंडीताप अशा संसर्गजन्य आजारांचे रूग्ण या काळात वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातील संसर्गजन्य साथरोग व कोरोना यांच्या दुहेरी आव्हानांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे, हे लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. कंटेटमेंट झोन तयार करताना केवळ संसर्गित व त्याच्याशी संबंधित क्षेत्रातच त्याची अंमलबजावणी व्हावी, कंटेटमेंट झोनमुळे संबंध नसलेल्या लोकांचे जनजीवनावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. संसर्गितांना कुठेही सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागणार नाही, त्यासाठी भेदभाव विरहित व भिती विरहित कोरोनासह जीवनशैलीसाठी येणाऱ्या काळात आपल्याला जनजागृती करावी लागणार आहे, असेही यावेळी डॉ करीर यांनी सांगितले.

बैठकीचे सुरुवातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापलिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एकंदरीत जिल्ह्याचे व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर सादरीकरण करून कोरोना व्यवस्थापनाची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत वस्तुनिष्ठ माहिती सादर केली. यावेळी झालेल्या चर्चेत विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ आरती सिंह यांनी सहभाग घेतला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात जळगाव जिल्ह्याचा देखील वरील प्रमाणे सविस्तर आढावा डॉ. करीर यांनी घेतला. त्यावेळी जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com