मिस्ड कॉलद्वारे ‘आप’ची दिल्ली ते गल्ली मोहीम

मिस्ड कॉलद्वारे ‘आप’ची दिल्ली ते गल्ली मोहीम

स्थानिक स्वराज्य संंस्था लढविणार : ‘झाडू’ने सफाईची तयारी

नाशिक । कुंदन राजपूत

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालात आम आदमी पक्षाने भाजपसह इतर पक्षांना ‘झाडू’ने साफ केल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. निकालाच्या दिवसापासून पक्षाने राष्ट्रनिर्मितीसाठी मिस्ड कॉल ही मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत १८ लाख लोकांनीे दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल दिले आहेत. मिस्ड कॉल देणार्‍या लोकांना तुम्ही आम आदमी पक्षाचे सदस्य होणार का, अशी विचारणा केली जाणार असून त्यांना त्यांच्या आवडीनुसार संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल. यामाध्यमातून बूथ लेवलं संघटन मजबूत करुन दिल्लीचा अजेंडा गल्लीत राबवून स्थानिक स्वराज्य संस्थेत ‘झाडू’ चालविण्याची जोरदार तयारी पक्षाने केली आहे.

दिल्ली निवडणुकांमध्ये ‘अच्छे बिते पाच साल लगो रहो केजरीवाल’ म्हणत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला कौल दिला. केजरीवाल यांंच्या सुनामीत ‘मोदी’ लाट फिकी पडली. या विजयानंतर देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा अजेंडा हाती घेण्यात आला आहे.देशभरातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी दिल्लीच्या निकालाच्या दिवशी राष्ट्रनिर्मितीसाठी मिस्ड कॉल ही मोहीम हाती घेतली. पक्षाने दिलेल्या नंबरवर पहिल्याच दिवशी ११ लाख लोकांनी मिस्ड कॉल देत प्रतिसाद दिला. त्या माध्यमातून देशभरात पक्षाचा विस्तार केला जाणार असून बूथ लेवल संघटन मजबूत करण्याची रणनीतीवर काम सुरू आहे.

या मोहीमेची जबाबदारी दिल्लीचे श्रम मंत्री गोपाल राय यांंच्याकडे आहे. पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात त्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आला असून त्यासांठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. त्या ठिकाणी राज्य, जिल्हानिहाय मिस्ड कॉलचा डाटा एकत्र केला जाईल. त्याद्वारे कोणत्या राज्यात किती प्रतिसाद मिळाला व पक्ष विस्ताराची संधी याची चाचपणी केली जाईल. मिस्ड कॉल देणार्‍या नागरिकांना पक्षाकडून कॉल केले जाणार असून तुम्ही पक्षाचे सदस्य होण्यास इच्छूक आहात का, अशी विचारणा केली जाईल. त्यांनी होकार दिल्यावर शहर व जिल्हानिहाय त्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल. या माध्यमातून बूथ लेवल नेटवर्क मजबूत करून नागरिकांना पक्षांशी जोडले जाईल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संंंंस्थेत दिल्लीचा मोफत पाणी, वीज, शिक्षण हा एजेंडा राबवून इतर पक्षांना ‘झाडू’ने साफ करण्याची करण्याची रणनीती आखली जात आहे.

गत वेळी पक्षाला दिल्लीत बंपर विजय मिळाल्यानंतर त्यांनी थेट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती. मात्र, दिल्लीबाहेर पक्षाचे नेटवर्क नसल्याने फाजिल आत्मविश्वास नडला व हाती भोपळा मिळाला होता. त्यामुळे बूथ लेवलवर पक्ष विस्तारासाठी मिस्ड कॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे.

विकासाच्या दिल्ली मॉडेलला जनतेने तिसर्‍यांदा पसंती दिली. महाराष्ट्रात आपची लोकप्रियता वाढत असल्याचे मिस्ड कॉलमधून दिसून येत आहे. पुढील एप्रिल महिन्यात होणारी नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पक्ष संपूर्ण ताकदीने लढविणार आहे.
– गोपाल राय,  श्रम मंत्री तथा मिस्ड कॉल मोहीम संयोजक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com