दिव्यांग सायलीची ४१ पदकांना गवसणी
स्थानिक बातम्या

दिव्यांग सायलीची ४१ पदकांना गवसणी

Abhay Puntambekar

१९ सुवर्ण, १७ रौप्य, ५ कांस्यपदकांचा समावेश; शिवछत्रपती पुरस्कारार्थींमध्ये दिव्यांगांमध्ये अग्रस्थानी

नाशिक । दिनेश सोनवणे

घरची परिस्थिती बेताचीच. त्यात जन्मतः माझ्या एका हाताला आणि एका पायाला अपंगत्व आलेले होते. त्यामुळे सुरुवातीलपासूनच आई-वडिलांनी खूप काळजीने मला लहानाचे मोठे केले. २०१० साली मी नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे जलरणाचे धडे घेऊ लागले.

दुसर्‍याच वर्षी २०११ मध्ये गंगापूररोडवरील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी मला घनश्याम कुवर यांनी जलतरणाचे धडे दिले. माझ्यातील जिंकण्याची इच्छाशक्ती बघून घनश्याम सरांनी मला नोव्हेंबर २०११ साली राज्यपातळीवर स्पर्धा खेळण्यासाठी औरंगाबाद येथे पाठवले.

या ठिकाणी मी दोन प्रकारात खेळले. एक म्हणजे फ्री स्टाईल आणि दुसरा बॅकस्ट्रोक. या ठिकाणी माझी कामगिरी खूप चांगली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होऊ लागले. त्यानंतर मालवण येथे २०१८ मध्ये मी पहिल्यांदाच समुद्रात जलतरण केले. यामध्ये जवळपास २ कि.मी.पर्यंत मी समुद्रात जलतरण केले होते.

आतापर्यंत राज्यस्तरील स्पर्धांमध्ये मला १७ सुवर्णपदके मिळाली आहेत, तर राष्ट्रीयपातळीवर मला दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. राष्ट्रीयस्तरावर मला ९ रौप्यपदके मिळाली आहेत, तर राज्यस्तरावर ८ रौप्यपदके मिळवली आहेत. राष्ट्रीयस्तरावर मला आतापर्यंत तीन कांस्यपदके तर राज्यस्तरावर दोन कांस्यपदके मला मिळाली आहेत. सध्या मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम खेळ करून मला नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार पोहोचवायचे आहे.

चाणाक्ष सायली
सायली माझ्याकडे आली तेव्हा तिला चालताही येत नव्हते. तिला स्वीमिंगची आवड होती. त्यामुळे इतर कुठली ट्रिटमेंट करण्याऐवजी तिला स्वीमिंग करून चालते करण्याची तयारी दाखवली. आज सायली चालू शकते तसेच ती समुद्रातही चांगली स्वीमिंग करू शकते. पुढे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिला सहभागी व्हायचे आहे. तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. – घनश्याम कुवर, सायलीचे प्रशिक्षक

Deshdoot
www.deshdoot.com