लासलगाव येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; वोक्हार्ट, नामको हॉस्पिटलचे सहकार्य

jalgaon-digital
2 Min Read

लासलगाव | प्रतिनिधी

नाशिकच्या मातीतून अंकुरलेले एकमेव वृत्तपत्र दैनिक ‘देशदूत’ सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरू झाले आहे. आज (दि.२१) लासलगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत श्री महावीर जैन विद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपणार्‍या ‘देशदूत’ने सुवर्णमहोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील २० ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नामांकित वोक्हार्ट आणि नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून मौलिक मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर या तपासण्या महोत्सवात केल्या जाणार आहेत.

सुवर्णमहोत्सवानिमित्त मार्च २०२० अखेरपर्यंत देशदूत जिल्ह्यातील २० ठिकाणी हा आरोग्य महोत्सव घेत आहे. लासलगाव येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी सरपंच संगीता शेजवळ, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, माजी जि. प. सदस्या कुसुम होळकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनील अब्बड, मुख्याध्यापक दिलीप डुंगरवाल, देशदूतचे महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजूंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बचतगटांची जत्रा
आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणी बचतगटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचतगटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
सामाजिक भान जपत देशदूततर्फे श्री महावीर जैन विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *