शहरात विकासकामांसाठी व धोकादायक बनलेली ६५ झाडे तोडणार; ३४ झाडांचे होणार पुनर्रोपण

शहरात विकासकामांसाठी व धोकादायक बनलेली ६५ झाडे तोडणार; ३४ झाडांचे होणार पुनर्रोपण

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील विविध भागात विकासकामांत आणि अपघातांना कारणीभूत ठरणारी, धोकादायक अशा ३४ देशी प्रजातीच्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा आणि ६४ झाडे तोडण्याचा निर्णय आज महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत घेण्यात आला. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यापुढे दर पंधरा दिवसाला सभा घेण्याचा आणि वृक्षतोडीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारासंदर्भात कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वृक्ष प्राधिकरण समितीची पहिली सभा अध्यक्ष तथा आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली आज तीन तास चालली. सभेला सदस्य नगरसेवक चंद्रकांत खाडे, शामकुमार साबळे, अजिंक्य साने, नीलेश ठाकरे, डॉ. वर्षा भालेराव, संगीता गायकवाड, अशासकीय सदस्य पुंडलिक गिते, बबन वाघ, उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले, वृक्ष अधिकारी व उद्यान निरीक्षक उपस्थित होते.

या सभेमध्ये २२ विषय चर्चेला होते. त्यापैकी एख विषय वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत व एक विषय वृक्ष प्राधिकरणाच्या बजेटबाबत होता. तसेच इतर २० विषय वृक्ष तोडणे व पुनर्रोपण करण्यासंदर्भात होते. त्यानंतर अतितातडीचे व रखडलेल्या प्रकल्पांबाबत असणार्‍या विषयांवर चर्चा होऊन यात ज्या प्रजातींच्या झाडांचे पुनर्रोपण होऊ शकतील अशा 34 झाडांचे पुनर्रोपन करण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली. तसेच विकासकामांत येणारी ६४ झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर सदस्यांनी सुचवल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी देण्यात येणार्‍या प्रस्तावांबाबत कशा प्रकारची कार्यपद्धती निश्चित करावयाची याबाबत चर्चा करण्यात आली. यात एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात ५ वृक्षांची लागवड करणे व या वृक्षांची ५. वर्षे देखभाल करणे. त्याचबरोबर वड, पिंपळ व उंबर प्रजातीच्या वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करणे असा निर्णय घेण्यात आला.

या विषयामध्ये मुख्यत्वे रस्त्यांमधील जी झाडे जीवितास व वित्तहानीस धोकादायक ठरत आहेत ती झाडे आणि शासकीय प्रकल्पास व विकासकामांत अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभेवर आगामी वर्षाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सुधारीत अंदाजपत्रकास दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण सभा दर 15 दिवसांच्या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या सभेत काही प्रकल्पास अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यात व पुनर्रोपणास मंजुरी देण्यात आली. यात अंबड औद्योगिक वसाहतीमधील वीज केंद्र विकसित करणे या कामात अडथळा निर्माण करणारा काशिद १८ व गिरीपुष्प ६ एकूण २४ झाडे तोडण्यास मंजुरी दिली. नाशिकरोड विभागातील देवळाली सर्व्हे नं. ११७ (पै) आरक्षण क्र. २०७ येथील नाट्यगृह इमारतीस अडथळा निर्माण करणारी २६ काटेरी बाभूळ व १ सुबाभूळ तोडणे तसेच २९ चंदन वृक्ष पुनर्रोपन करण्यास परवानगी देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (दत्तमंदिर सिग्नल ते द्वारकापावेतो) दरम्यान अपघातास व ट्रॅफिककरिता अडथळा निर्माण करणारी वड ८ व मोह वृक्ष १ याचे पुनर्रोपन करण्यास व कडुलिंब ९, शिरस १, करंजी १, आंबट चिंच ३, विलायती चिंच १ असे वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली.

पोलीस आयुक्तालयामार्फत प्राप्त अहवालानुसार महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणची अपघातास कारणीभूत ठरणारी, रस्त्याच्या मधोमध असणार्‍या एकूण १४ वृक्षांचे पुनर्रोपण करणे व ११ वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली. नाशिक पश्चिम विभागातील जिल्हा परिषद भवनच्या बांधकामात बाधित होत असणार्‍या वृक्षांपैकी ११ वृक्षांचे पुनर्रोपन करणे व १२ वृक्ष तोडण्याकरिता परवानगी देण्यात आली.

धोकादायक झाडांमुळे ४ वर्षांत ३१ जणांचा मृत्यू
आजच्या वृक्ष प्राधिकरण समिती सभेत शहर पोलिसांकडून एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यात अपघातास व मृत्यूस कारणीभूत असलेली २४ ठिकाणची झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावासोबत शहर पोलिसांनी गेल्या वर्षात झाडावर वाहन आदळून झालेल्या अपघातांचा आढावा घेऊन काही आकडेवारी देण्यात आली होती. यात सन २०१५ ते २०१९ (नोव्हेंबर) पर्यंतच्या चार वर्षांत २३ अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते, तर २०१९ या वर्षात तीन अपघात झाल्याचे म्हटले होते. अपघाताचे प्रमाण आणि मृत्यूचा आकडा पाहता २४ झाडे तोडण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. यात समितीने अपघातास कारणीभूत ठरणारी ११ झाडे तोडण्यात आणि १४ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मंजुरी दिली. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com