अभ्यास दौर्‍याचा निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना;  जि. प. महिला व बालकल्याण समितीचा निर्णय – सभापती खोसकर
स्थानिक बातम्या

अभ्यास दौर्‍याचा निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना; जि. प. महिला व बालकल्याण समितीचा निर्णय – सभापती खोसकर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विदर्भातील जिल्हा परिषदांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पद्धत जाणून घेण्यासाठी महिला व बालकल्याण समितेचा नियोजित अभ्यास दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.या अभ्यास दौर्‍यासाठी तरतूद करण्यात आलेल्या पाच लाखांचा निधी जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.यामुळे बळीराजा उध्वस्त झालेला आहे नुकसानग्रस्त शेतीमालाचे पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत,माजी पालकमंत्री गिरीश महाजन,आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दिलेल्या निवेदनात नाशिक जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख केला होता.

नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या काळात जिल्ह्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बाब यातून पुढे आली होती.त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अभ्यास दौर्‍यावर निधी खर्च करणे संयुक्तिक नाही,असे सांगत सभापती खोसकर यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण समिती विदर्भामध्ये अमरावती,वर्धा,नागपूर,गोंदिया,भंडारा जिल्हा परिषदांना भेटी देण्याचे नियोजन होते. समितीच्या अभ्यास दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये पाच लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.मात्र,हा दौरा रद्द करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या दौर्‍यातील निधी संकटग्रस्त शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्ग करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची शिफारस समितीच्या सभासदांनी सभापतींकडे केली.त्यानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती सभापती खोसकर यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत.अशा वेळी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीने अभ्यास दौरा रद्द करत हा निधी शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच बैठक घेणार आहे.यामध्ये फरक केलेला पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणार आहे. अर्पणा खोसकर; सभापती महिला व बालकल्याण,जि.प.

Deshdoot
www.deshdoot.com