मनमाडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेले १३० भाविक पंजाबकडे रवाना
स्थानिक बातम्या

मनमाडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेले १३० भाविक पंजाबकडे रवाना

Abhay Puntambekar

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मनमाड येथील गुरुद्वारात पंजाब येथील १३० भाविक अडकून पडले होते. या सर्व भाविकांना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पंजाब येथे परतण्याची व्यवस्था करण्यात आली. ना.छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पंजाबमध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना ज्या बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आले त्याच बसेसच्या माध्यमातून मनमाड येथील पंजाबी भाविकांना परत पाठविण्यात आले.या भाविकांनी पालकमंत्री ना.छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आणि राज्यशासनाचे आभार मानले आहे.

पंजाब राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश चंद्रा यांनी आपल्या पत्रांन्वये महाराष्ट्र राज्यशासनाकडे मनमाडमध्ये अडकलेल्या १३० भाविकांना पंजाब मध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली होती. या मागणी नंतर ना.छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वयातून मनमाड येथील भाविकांना पंजाब राज्यात परतण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी पंजाब मधून ज्या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणण्यात आले त्या बसेसच्या माध्यमातून सर्व भाविकांना आपल्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

मनमाडमध्ये अडकलेल्या या सर्व भाविकांना पंजाब मध्ये जाण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या भाविकांना मध्यप्रदेश, राजस्थान या मार्गे पंजाबमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच पंजाबमध्ये पोहचल्यानंतर या सर्व नागरिकांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यासाठी मनमाड गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजीत सिंह जी,धनंजय कमोदकर,रणजीत सिंह आनंद,मोहीत नारंग,बलजित सिबल व पंजाबी असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com