फेरीवाला सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप; शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आयुक्तांचे आदेश
स्थानिक बातम्या

फेरीवाला सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप; शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आयुक्तांचे आदेश

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

महापालिका प्रशासन आणि शहर फेरीवाला समितीकडुन अंतीम करण्यात आलेल्या शहरातील ५ हजार १६८ फेरीवाले सदस्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय आज आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला. दरम्यान दसक येथे एका सामाजिक मंडळांकडुन महापालिकेच्या जागेवर यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या बाजाराची पाहणी करुन यांचा मॉडेल म्हणुन वापर करण्यासंदर्भात सुचना आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिल्या.

महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाच्यावतीने आज शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ऑगस्ट २०१८ नंतर झालेल्या आजच्या बैठकीत काही महत्वपुर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. यात राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील सर्वच विभागातील फेरीवाले, रस्त्ंयांच्याकडेला बसणारे विक्रेते, हॉकर्स व टपरीधारकांची बायोमेट्रीक नोंदणी महापालिकेकडुन करण्यात आली असुन हा आकडा ९ हजार ६२० इतका आहे.

यानंतर या फेरीवाल्यांकडुन भरुन घेण्यात आलेल्या माहितीची छाननी करण्यात आल्यानंतर दुबार नावे व इतर कारणास्तव काही नावे कमी झाले असुन याचा आढावा घेण्यात आला. यात प्रशासनाकडुन अंतीम करण्यात आलेल्या ५ हजार १६८ सदस्यांना त्यांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. यानुसार या ओळखपत्राचे वाटप करण्याचे आदेश आज देण्यात आले.
तसेच शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार करण्यात आलेल्या फेरीवाला क्षेत्राचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

आत्तापर्यत महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या २२५ फेरीवाला झोन पैकी प्रत्यक्षात १३२ फेरीवाला झोन बसविण्यात आलेले आहे. तसेच ८३ फेरीवाला झोन राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच नाशिक पश्चिम मधील गंगावाडी घासबाजार, हनुमान घाटाजवळ, आकाशवाणी केयद्राजवळ, पंचवटी विभागात पेठरोड पाटालगत (दोन ठिकाणे), नाशिकरोठ विभागात जनपत सोसायटी कॅनलारोडगलत, के. एन. केला जवळ, सर्वे नंह. 130 खेळाचे मैदान, वडनेर गावठाण, हनुमान मंदीराजवळ. सातपूर विभागात श्रमीकनगर भाजीमंडई, केदारनगर, शिवाजीनगर भाजीमंडई, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यांच्यासह एकुण ११ फेरीवाला झोन बसविणे बाकी आहे.

याचर्चेत नाशिकरोड दसक येथील माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्या पुढकाराने एका सामाजिक मंडळाने महापालिकेच्या जागेवर भाजीबाजार बसविण्याचे उत्तम नियोजन केल्याची माहितीवर चर्चा करण्यात आली. तेव्हा या बाजाराची पाहणी अधिकार्‍यांनी करावी आणि यानंतर एक मॉडेल म्हणुन यानुसार इतर ठिकाणी फेरीवाला झोन कार्यरत करता येईल का ? याची माहिती घ्यावी असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

Deshdoot
www.deshdoot.com