सावाना ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी प्रा. गो.तु.पाटील यांची निवड
स्थानिक बातम्या

सावाना ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी प्रा. गो.तु.पाटील यांची निवड

Abhay Puntambekar

नाशिक| प्रतिनिधी 

सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना) या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची बैठकीत यंदाचा ‘सावाना जीवनगौरव पुरस्कार’ जिल्ह्यातील लेखकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार यावर्षी अनुष्टुभ परिवारातील ज्येष्ठ संपादक, व्यवस्थापक, विश्वस्त प्रा.गो.तु.पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सावानाचा जीवन गौरव प्रथम पुरस्कार लेखक श्री. चंद्रकांत महामिने व द्वितीय पुरस्कार लेखक मा.श्री. प्रभाकर बागूल यांना देण्यात आला होता.

अनुष्टुभबरोबरच स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो.तु.पाटील यांनी वि.वा.शिरवाडकरांच्या हयातीत ‘नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ‘ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो.तु.पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्व खान्देशातील एक लहान खेड्यातून त्यांनी शिक्षणाच्या बळावर प्रवास केला. प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करत असतांना त्यांनी मराठी विषय घेऊन एम. ए. पदवी संपादन केली गेवराई (बीड ) मालेगाव, येवला. या महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे काम केले.विद्यार्थीप्रिय शिक्षक ही त्यांची ओळख असून, ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करत राहतात. शेतकरी संघटनेचा नेता असणाऱ्या मोहन गुंजाळ याच्या स्मृतिग्रंथाचे संपादन त्यांनी रणजीत परदेशी यांच्यासमवेत केले आहे. नुकतेच त्यांच्या पत्नी शांताबाई पाटील यांचे निधन झाल्यावर त्यांनी कर्मकांडे केली नाहीत. धीरोदात्तपणे पत्नीवियोग त्यांनी स्वीकारला.

जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप रु.२१,०००/- रोख स्मृतीचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे आहे.
वैयक्तिक ग्रंथालय पाहायचे असेल तर गो.तु.पाटील यांच्याकडे जावे. त्यातून त्यांचा व्यासंग दिसून येतो. एक प्रसन्न, समृध्द लेखक, संपादकाचा गौरव सावाना करणार आहे, असे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, उपाध्यक्ष किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ.धर्माजी बोडके व सहाय्यक सचिव अॅड.अभिजित बगदे, ग्रंथसचिव गिरीश नातू, अर्थसचिव शंकरराव बर्वे, सांस्कृतिक कार्यसचिव प्राचार्या.डॉ.वेदश्री थिगळे, नाट्यगृह सचिव देवदत्त जोशी, बालविभागप्रमुख संजय करंजकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. यांचेतर्फे सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com