Monday, April 29, 2024
Homeनाशिकपोलीस प्रबोधिनीत ३० ला दीक्षांत संचलन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती

पोलीस प्रबोधिनीत ३० ला दीक्षांत संचलन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत संचलन समारंभ ३० डिसेंबरला होत असून यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील मुख्य कवायत मैदानावर सोमवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता हा दीक्षांत सोहळा रंगणार आहे. या दीक्षांत संचलनास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

येथे प्रशिक्षण घेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची ११७ वी तुकडी येथून प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू होणार आहे. २२ ऑक्टोबर २०१८ पासून या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले होते. यामध्ये राज्यातील ४७७ पुरुष तर १९२ महिला तसेच गोवा राज्यातील २० पुरुष असा एकूण ६८९ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. दीक्षांत संचलनात मानवंदना, निशान टोळीस मानवंदना, प्रशिक्षणार्थींना शपथ, दीक्षांत संचलन परेड, बक्षीस वितरण व प्रमुख पाहुण्यांचे संबोधन असे कार्यक्रम होणार आहेत.

या संचलनानंतर प्रबोधिनीतील इनडोअर फायरींग रेंज, अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी व फुटबॉल मैदान व ओवल मैदानातील सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन उपस्थितांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सहसंचालक, विभागाचे विशेष पोलीस निरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्ह्याच्या अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या