सावधान! रंगपंचमीत फुगे फेकून माराल तर खावी लागू शकते जेलची हवा
स्थानिक बातम्या

सावधान! रंगपंचमीत फुगे फेकून माराल तर खावी लागू शकते जेलची हवा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

रंगपंचमी सणामध्ये रंग खेळताना रंगाने भरलेले किंवा रासायनिक पदार्थाचा वापर करुन भरलेले फुगे फेकून मारण्यास मनाई करण्यात आली आहे. फुगे फेकून मारणारे तसेच फेकून मारण्यासाठी जवळ बाळगणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

धूलिवंदन, व रंगपंचमी हे सण नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या उत्सवात लहान मुले, तरुण-तरुणी आबाल वृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. धूलिवंदन व रंगपंचमी या दिवशी रंग खेळण्यासाठी रंगाने भरलेल्या रबरी फुग्यांचा वापर केला जातो.

असे फुगे मारल्याने समोरच्या व्यक्तीस गंभीर स्वरुपाच्या शारीरिक इजा होऊ शकते किंवा कायमस्वरुपी अपंगत्व येऊ शकते. रंगपंचमीचा सन साजरा होत असताना अचानक फुगा फेकून मारल्याने सार्वजनिक रस्त्याने दुचाकी, चारचाकी अन्य प्रवासी वाहनांच्या चालकाचे लक्ष विचलित होऊन गंभीर स्वरुपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून हे फुगे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

शहरात खबरदारीचा उपाय म्हणून रंग तसेच रासायनिक पदार्थ भरून फुगे (मिसाईलसारखा वापर करण्याच्या उद्देशाने) बाळगणे, रंगाने भरलेले फुगे किंवा अन्य रासायनिक पदार्थ वापर करून मारून फेकणे यास परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी 15 मार्च पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार फुगे मारण्यास प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com